- सुनील चरपे
नागपूर : दर एमएसपीपेक्षा कमी हाेताच सीसीआयने कापसाची एमएसपी दराने खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. सीसीआय दरवर्षी देशभरातील एकूण उत्पादित कापसाच्या ३० ते ३४ टक्केच कापूस खरेदी करते. यातील २ ते ५ टक्के कापसाला केंद्र सरकारने जाहीर केलेली एमएसपी दिली जात असून, ९५ ते ९८ टक्के कापूस या एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी केला जाताे.
या एमएसपी दर कपातीसाठी धाग्याची लांबी, ओलावा व मायक्राेनियर अशी कारणे पुढे केली जातात. सीसीआयला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना आधी ऑनलाइन नाेंदणी करणे अनिवार्य केले आहे. या नाेंदणीची पद्धतीही क्लिष्ट केली आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडील कापसाच्या धाग्याची लांबी आणि मायक्राेनियर मुळीच तपासले जात नाही. या दाेन्ही बाबी तपासण्याचे संयंत्र काेणत्याही खरेदी केंद्रावर उपलब्ध नसते. सीसीआयचे ग्रेडर या दाेन्ही बाबी केवळ त्यांच्या नजर पाहणीने तपासतात काय? असा प्रश्न उपस्थित हाेताे.
ग्रेडर त्या कापसातील ओलावा कापूस वाहनात असतानाच मशीनद्वारे माेजतात. १२ टक्क्यांपेक्षा अधिक ओलावा असेल तर कापूस परत केला जाताे किंवा त्या कापसाचे दर कमी केले जातात. पण ताेच कापूस वाहनातून बाहेर काढला आणि किमान दाेन तासांनी त्यातील ओलावा माेजला तर आधीच्या ओलाव्यापेक्षा किमान दाेन ते तीन टक्के ओलावा कमी हाेताे. बंद वाहनांमधील कापसाचा ओलावा अधिक येत असल्याने ग्रेडर माेकळा केलेल्या कापसातील ओलावा माेजण्यास नकार देतात.
कापूस खरेदीचे मापदंड
सीसीआय दरवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात त्यांची एमएसपी ऑर्डर जाहीर करते. यात कापसाच्या धाग्याची लांबी, मायक्राेनियर आणि ओलावा हे तीन मापदंड आणि त्यानुसार कापूस खरेदीचे दर दिले जातात. मायक्राेनियरच्या नावाखाली २५ रुपये तर ओलाव्याच्या नावाखाली १०० ते ३५० रुपये प्रति क्विंटल दर कमी केले जातात. सीसीआय ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी करते.
एमएसपीपेक्षा कमी दर
केंद्र सरकारने मागील वर्षी लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी ७,५२१ रुपये प्रति क्विंटल जाहीर केली हाेती. वास्तवात सीसीआयने किमान ९० टक्के कापूस ७,०२० ते ७,२२० रुपये प्रति क्विंटल तर ८ ते १० टक्के कापूस ७,३७० ते ७,४२१ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला. ओलाव्याच्या आधारे किती कापूस खरेदी केला, याच्या नाेंदी सीसीआय ठेवत नाही.
