गडचिरोली : जिल्ह्यात यंदा कापूस उत्पादनात झालेली घट आणि बाजारपेठेतील कमी आवक यामुळे कापसाच्या दराने साधारण उसळी घेतली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मध्यम धाग्याच्या कापसाला असलेल्या दरापेक्षा अधिक दर शेतकऱ्यांना मिळत आहे. मध्यम धाग्याच्या कापसाचे दर आता ८ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
यंदा लागवडीत झालेली घट आणि सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ, यामुळे कापसाच्या बाजारात तेजी दिसून येत आहे. सुरुवातीला ६ हजार ८०० ते ७हजार रुपयांवर स्थिरावलेले दर आता वेट ८ हजार रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात एकमेव आधारभूत कापूस खरेदी केंद्र चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथे आहे. येथे कापूस विक्रीसाठी यापूर्वीच नोंदणी करणे गरजेचे होते.
मध्यम धाग्याने आठ हजारांचा टप्पा ओलांडला !
आतापर्यंत कापसाचे दर ७ हजार ५०० रुपयांच्या आसपास होते. मात्र, आता त्यात अचानक वाढ झाली असून, जिल्ह्याच्या इतिहासात खुल्या बाजारात प्रथमच दराने आठ हजारांचा टप्पा गाठला आहे. खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने कापसाला आधारभूत भाव जाहीर केला होता. त्यानुसार मध्यम धाग्याच्या कापसाला ७,७१० व लांब धाग्याच्या कापसाला ८,११० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.
कापसाच्या दरात तेजी कायम राहणार काय?
बाजारपेठेतील सध्याची स्थिती पाहता, येत्या काळात मध्यम धाग्याच्या कापसाचे भाव ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप कापूस साठा शिल्लक आहे, त्यांचे डोळे आता पुढील दरवाढीकडे लागले आहेत. खुल्या बाजारपेठेत मालाची आवक कमी राहिल्यास कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापारी म्हणाले.
शेतकऱ्यांना खुल्या बाजारात अधिक दर मिळाला तर शेतकरी हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करणार नाही. वेळीच माल विक्री करून आपल्या आर्थिक गरजा भागवू शकतील; परंतु सीसीआय केंद्रावर नंबर येण्यासाठी उशीर झाल्यास शेतकरी मिळेल त्या दरात शेतमाल विक्री करतो.
- अनिकेत बट्टे, शेतकरी, मोहुर्ली
