Kapus Kharedi : मागील आठवड्यापासून खासगी बाजारात कापसाचे दर वाढू लागल्याने भारतीय कापूस महामंडळाकडे (CCI) कापसाची आवक जवळपास थांबली आहे. (Kapus Kharedi)
खासगी व्यापाऱ्यांकडून सध्या कापसाला कमाल ८ हजार ३०० रुपये, तर सरासरी सुमारे ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा खुल्या बाजाराकडे वळल्याचे चित्र आहे.(Kapus Kharedi)
यापूर्वी दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत सीसीआयकडे मोठ्या प्रमाणावर कापूस गेला होता. (Kapus Kharedi)
मात्र, कापसावरील आयातकर शून्य करण्यात आल्यानंतर खासगी बाजारातील मागणी वाढली आणि दरात सुधारणा झाली.
'सीसीआय'चा हमीभाव तुलनेने जास्त असला तरी खरेदी प्रक्रिया, प्रतिक्षा कालावधी आणि इतर अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना खासगीत कापूस विकावा लागला. त्यामुळे काही काळ शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे ५०० रुपयांचा फटका सहन करावा लागला.(Kapus Kharedi)
राळेगावात चार लाख क्विंटल कापूस खरेदी
राळेगाव तालुक्यात १० जानेवारीपर्यंत एकूण चार लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यामध्ये खासगी व्यापाऱ्यांनी दोन लाख ३४ हजार क्विंटल, तर 'सीसीआय'ने एक लाख ७० हजार क्विंटल कापूस खरेदी केला.
'सीसीआय'च्या माध्यमातून राळेगाव केंद्रावर ८० हजार, वाढोणा बाजारात ५५,३०८ आणि खैरी केंद्रावर ३४,०६८ क्विंटल कापसाची खरेदी झाली.
खासगी बाजारात राळेगाव येथे दोन लाख, वाढोणा बाजारात १८,४०९ आणि खैरी येथे १४,३५० क्विंटल कापूस विक्रीस गेला आहे.
दर अजून वाढण्याच्या शक्यतेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला असून, बाजारात आवक कमी झाली आहे.
'सीसीआय'ने स्पर्धात्मक दराने खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'सीसीआय'ची विक्रमी दहा लाख क्विंटल खरेदी
यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सीसीआयचे दर खुल्या बाजारापेक्षा प्रतिक्विंटल सुमारे एक हजार रुपयांनी अधिक होते.
त्यामुळे 'सीसीआय'ला आतापर्यंत दहा लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करता आली.
शेतकऱ्यांनी एकूण १३ लाख क्विंटल कापसाची विक्री केली असून, त्यापैकी १० लाख ९१ हजार २८४ क्विंटल कापूस सीसीआयने, तर तीन लाख १० हजार ६४८ क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे.
साधारणपणे ८० टक्के कापूस खासगी व्यापारीच खरेदी करतात. मात्र, यंदा याला अपवाद ठरला.
सीसीआयने मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने व्यापाऱ्यांकडे कापसाचा साठा कमी झाला. त्याचवेळी सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाची अद्याप विक्री न केल्याने खुल्या बाजारात कापसाचे दर वाढले आहेत.
हमीभावापेक्षा अधिक दर
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीसीआय केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा होत्या.
मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून खुल्या बाजारात गर्दी वाढली असून सीसीआय केंद्रांवर शुकशुकाट आहे.
खुल्या बाजारात कापसाचे दर ८,३४० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले असून, हे दर हमीभावापेक्षा सुमारे ३३० रुपयांनी अधिक आहेत.
कापूस खरेदीचे जिल्हानिहाय चित्र
यवतमाळमध्ये एक लाख, कळंब ६९ हजार, राळेगाव पावणेदोन लाख, घाटंजी ७२ हजार, पांढरकवडा एक लाख, मारेगाव सव्वा लाख, वणी पावणेतीन लाख, दारव्हा ८० हजार, नेर २५ हजार, आर्णी १४ हजार, पुसद २१ हजार, महागाव ३८ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे.
पुढे काय?
शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपल्यानंतर बाजारात नेहमीच तेजी येते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
आगामी काळात 'सीसीआय'ने खरेदी धोरणात बदल करून खुल्या बाजाराशी स्पर्धा केल्यास शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
