Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे बीड जिल्ह्यात सीसीआय (Cotton Corporation of India) तर्फे हमीदराने कापूस खरेदीला अखेर सुरुवात झाली आहे. (Kapus Kharedi)
दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी (१० नोव्हेंबर) रोजी बीड तालुक्यातील सिद्धी ॲग्रोटेक आणि कल्पतरू जिनिंग या दोन केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी १५ शेतकऱ्यांचा एकूण २८१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.(Kapus Kharedi)
हवामानातील बदल आणि पावसाच्या व्यत्ययामुळे कापूस खरेदी उशिरा सुरू झाली होती. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी सुरुवात झाली आहे. खरेदीदरम्यान किमान दर ७ हजार ७०० रुपये तर कमाल दर ८ हजार ६० रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून देण्यात आली.(Kapus Kharedi)
बीड तालुक्यात आतापर्यंत सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर ऑनलाइन नोंदणी केली आहे. पुढील काही दिवसांत गेवराईसह इतर खरेदी केंद्रांवरही सीसीआय खरेदीला प्रारंभ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Kapus Kharedi)
सीसीआयचे अधिकारी हर्षल पांडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी तो चांगला वाळवावा. ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास पूर्ण हमीदर मिळेल. जास्त आर्द्रतेमुळे कापूस रिजेक्ट होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी कापूस दोन ते तीन दिवस उन्हात चांगला वाळवूनच खरेदी केंद्रावर आणावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बीड व माजलगाव येथे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होण्याची शक्यता आहे. या सुरुवातीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलास्याचे हसू फुलले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kapus Bajar Bhav : राज्यात कापसाची आवक वाढली; पण दर घसरले वाचा सविस्तर
