नाशिक : श्रीलंका सरकारने मंगळवारपासून कांदा व बटाट्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ करत आपल्याकडील शेतकऱ्यांना धक्का दिला. तेथील बाजारपेठेत भारतातील कांदा व बटाट्याची गरज संपताच श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला.
कांद्याचे आयात शुल्क १० रुपये प्रति किलोवरून थेट ५० रुपये तर बटाट्याचे आयात शुल्क ६० रुपये प्रति किलोवरून ८० रुपये केल्याने तिकडे दोन्ही प्रकारचा शेतीमाल पोहोचविणे आता भारतातील शेतकऱ्यांना परवडणार नाही. विशेष करून या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. भारतातील दक्षिण भागातून बटाट्याची आयात श्रीलंकेस होते.
श्रीलंकेमधील कांदा मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तेथील शेतकऱ्यांचा विचार करता कांदा आयात शुल्कात वाढ केल्याची माहिती निर्यातदारांकडून व्यक्त केली जात आहे. श्रीलंका आयातदारांना पूर्वी भारतीय कांदा कमी दरात उपलब्ध करून देत होता. मागील पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात मागणीअभावी कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून कांद्यावरील निर्यात बंदी उठविली गेल्याने आशादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु, तिथेही पूर्ण क्षमतेने कांदा पोहोचू शकला नाही.
लासलगाव बाजारात सध्या २० ते २२ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. मागील सोमवारी क्विंटलचे सरासरी १,६०० रुपयांतर असणारे दर यावेळी १,५५१ रुपयांवर आले. त्यात आता श्रीलंका सरकारने घेतलेला निर्णय जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी अधिक अडचणीचा ठरेल. भारत सरकाने याविषयी अद्याप भूमिका जाहीर केली नाही. गेल्या वर्षी श्रीलंकेत कांद्याची निर्यात वाढली होती. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले होते.
असा बसणार फटका
कांद्यावरील आयात शुल्क वाढविल्याने मुख्यत्वे शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारण, यामुळे कांद्याचे बाजारभाव कमी होतात. परिणामी, त्यांना कमी उत्पन्न मिळते. तसेच यामुळे देशांतर्गत बाजारात जास्त पुरवठा होतो आणि कांद्याच्या किमती घसरतात. याउलट, जेव्हा भारत सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेते, तेव्हा शेतकऱ्यांना फायदा होतो. सध्या निर्यात बंदी उठविली असतानाही घाऊक बाजारात कांद्यांची किंमत सरासरी १२०० ते १३२५ रुपये प्रति क्विंटल एवढीच आहे.
कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत असताना श्रीलंका सरकारने घेतलेला निर्णय शेतकरी, व्यापारी, मजूर, ट्रान्सपार्ट, निर्यातदार या घटकांना पुढचे दोन महिने नुकसान पोहोचविणारे ठरतील. श्रीलंकेत सध्या कांद्याची आवक वाढल्याने त्यांना भारतातील कांद्याची गरज वाटत नसावी, बांगलादेश व श्रीलंका भारताचे सर्वाधिक मोठे कांदा निर्यातदार देश आहे.
- विकास सिंग, उपाध्यक्ष, निर्यातदार संघटना, नाशिक
पीक विम्याला तीनदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली, वाचा सविस्तर