Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Niryat : बांग्लादेशमधून रोजचे 575 आयपी परवाने, प्रत्येकास 30 टनांपर्यंत आयातीची परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:54 IST

Kanda Niryat : बांग्लादेश सरकारने कांदा आयातीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांची संख्या थेट चौपट वाढवली आहे.

नाशिक : बांग्लादेश सरकारने कांदा आयातीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांची संख्या थेट चौपट वाढवली आहे. आतापर्यंत दररोज ५० आयात परवाने देण्यात येत असताना दि. १३ डिसेंबरपासून दररोज २०० आयात परवाने जारी केले जात आहेत. शिवाय यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 

यामुळे भारतातून बांग्लादेशात जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार असून, देशांतर्गत बाजारातही कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच बांग्लादेशने भारतीय कांद्याची आयात सुरू केल्यानंतर सुमारे १५०० टन कांदा बांग्लादेशात पोहोचला असून, त्याचा सकारात्मक परिणाम निर्यातीवर दिसू लागला आहे. 

त्याचबरोबर देशांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठांमध्येही कांद्याच्या दरात हालचाल जाणवू लागली आहे. बांग्लादेश सरकारने स्थानिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, प्रत्येक आयात परवान्यांतर्गत ३० टनांपर्यंत कांद्याची आयात करता येणार आहे. त्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास ४० टक्क्यांहून अधिक वाटा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४.८० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती. ज्यातून देशाला १७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते.

भाववाढीबाबत निर्माण झाला आशावादकांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही आयात प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय कांदा निर्यात आणि भाववाढीबाबत आशावाद निर्माण झाला आहे.

बांगलादेश कांदा निर्यात टनामध्ये

  • सन २०२०-२१-५ लाख ५२ हजार मे टन
  • सन २०२१-२२-६ लाख ५८ हजार मे टन
  • सन २०२२-२३-६ लाख ७१ हजार मे टन
  • सन २०२३-२४-७ लाख २४ हजार मे टन
  • सन २०२४-२५-४ लाख ८० हजार मे टन

बांग्लादेशने आयात परवाने वाढवल्यामुळे कांदा निर्यातीला मोठा हातभार लागणार आहे. मागणी वाढल्यास कांदा निर्यात होण्यास मदत होईल. लासलगाव, पिंपळगावसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आवक नियंत्रित होऊन भावात हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.- विकास सिंह, कांदा निर्यातदार

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकबांगलादेश