Kanda Market : १४ ऑगस्टपासून बांगलादेश सरकारने (Bangladesh) भारतीय कांद्याची आयात करण्यास परवानगी दिली आहे. हळूहळू तेथे गरजेनुसार भारतीय कांद्याची निर्यात वाढत जाईल त्याचबरोबर श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, दुबई, कतार, यमन, व्हिएतनाम, मॉरिशस आणि लंडन अशा अनेक देशांमध्येही भारतीय कांदा निर्यात सुरू आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे चाळींमध्ये साठवलेला कांदा आता सडू लागला आहे. चार महिन्यांपूर्वी ठेवलेला जो कांदा आजही चांगल्या दर्जात उपलब्ध आहे. अशा कांद्याला देशांतर्गत मागणी आणि निर्यात वाढत असल्याने येत्या काळात कांद्याला दरवाढ होण्याची संकेत निश्चित आहेत. त्यासाठी शेतकरी बांधवांनी मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन जात असताना त्या कांद्याची चांगली निवड (प्रतवारी) करून टप्प्याटप्प्याने घेऊन जावे आणि राज्यातील बाजार समित्यांमध्ये आपल्या कांद्याची एकदमच जास्त आवक होणार नाही याचीही काळजी घ्यावी
सर्व शेतकऱ्यांनी आत्मविश्वास ठेऊन बाजारपेठेवर लक्ष ठेवावे. आपल्या कष्टाला योग्य मोबदला मिळेल, अशी आश्वस्त करणारी स्थिती निर्माण झाली आहे. काही अफवा किंवा गैरसमज पसरवणारे मॅसेज, व्हिडिओ, बातम्या जरी आल्या तरी त्याची पूर्णपणे खात्री करून राज्यातील कांदा उत्पादकांना खरी माहिती देण्याचे काम कांदा संघटनेकडून करते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये आणि आपला कांदा स्वस्तात विक्री करु नये, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.
कांदा साठवून करून जवळपास पाच महिने पुर्ण होत आहेत. मग आणखी किती दिवस कांदा चाळीत राहू शकतो? त्याला काही मर्यादा आहेत का? तर होय. पुढे सप्टेंबर अक्टोबर महीन्यात थंडी, पाऊस, उष्णता असे तिहेरी वातावरण अनेकदा आपण बघितले आहे. असे वातावरण निर्माण झाले तर कांदा कोम फेकत असतो हे प्रमाण इथून पुढे सुरुवात होईल. कांदा कोम फेकायला लागला तर वजनात घट व कांदा खराब होणे या गोष्टी होत असतात. कांदा विकायचा का ठेवायचा?कांदा चाळीच्या आतुन पत्र्याला सकाळी पाहिले तर पाणी टपकताना दिसेल. कांदा टरफले कडक न राहता नरम होतील, अशी लक्षणे दिसत असतील तर कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढते. चाळीच्या वरील बाजूने दिड फूट कांदा उकरून बघावे. जर आतून गरम वाफ येत असेल तर समजून घ्या, चाळ बसली म्हणून. यानंतर वजनात घटही दिसून येईल. इथून पुढे कांदा हा दुसऱ्या पिढीकडे वाटचाल करताना दिसेल, म्हणून आपल्या चाळीची परीस्थिती बघून ठरवा, कांदा विकायचा का ठेवायचा, असे आवाहन शेतकरी अनिल काळे यांनी केले आहे.
Kanda Market : लासलगाव, सोलापूर, नागपूर मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर