Join us

Kanda Market : कांदा दराचा फटका, शेतकरी हवालदिल, लासलगावला संघटनेची महत्वपूर्ण बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:15 IST

Kanda Market : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये (Lasalgoan Kanda Market) ही बैठक होणार आहे.

नाशिक : एकीकडे कांदा बाजारात होत असलेली घसरण (Kanda Market Down), सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने बैठक आयोजित केली आहे. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये (Lasalgoan Kanda Market) ही बैठक होणार आहे. कांद्याच्या बाजारभावावरील गंभीर स्थितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासाठी अती तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन देणे, तसेच आवश्यक उपाययोजना सुचवणे या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात येत आहे. संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि शेतकरी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी दिली आहे. 

बैठकीतील महत्वाचे मुद्दे 

  • सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावाचा आढावा घेणे 
  • शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च आणि तोट्याची मांडणी करणे
  • शासनाच्या अनुदान/हस्तक्षेप खरेदी/किमान आधारभूत किंमत याबाबत मागण्या करणे 
  • मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करणे
  • नाफेड, एनसीसीएफची कांदा खरेदी शेतकरीपूरक करण्यास भाग पाडणे 
  • पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे. 

आदी महत्वपूर्ण मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी संघटनेचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असे जयदीप भदाणे, केदारनाथ नवले यांनी कळविले आहे.

Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक