Kanda Market : एकीकडे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक (Onion farmers) शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारकडून ठोस पाउले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. असे असताना आंध्र प्रदेश सरकारने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू (Andhra Pradesh CM Chandrababu Naidu) यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत कांद्याला 1200 प्रति क्विंटल मदतभाव जाहीर केला आहे. सचिवालयात घेतलेल्या पुनरावलोकन बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
कांद्याचे भाव सध्या खूपच घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. ही खरेदी मार्केट इंटरव्हेन्शन फंड (बाजार हस्तक्षेप निधी) वापरून केली जाणार असून नंतर हा कांदा 'रयतु बाजार'च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
मुख्यमंत्रींनी यावेळी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. तसेच रयतु बाजारांची संख्या वाढवण्याचे आणि त्याठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय, भाव स्थिर राहावा आणि शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा व्हावा, यासाठी गोदाम आणि कोल्ड चेन व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्रींनी नमूद केले. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या उत्पादनाला किमान हमीभाव मिळेल अशी अपेक्षा आहे.