Join us

Kanda Andolan : लाल कांदा दरात घसरण, लासलगाव बाजार समितीत लिलाव पाडले बंद, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:54 IST

Kanda Andolan : गेल्या दहा दिवसात लासलगाव बाजार समिती कांद्याच्या दरात 2500 रुपयांची मोठी घसरण झाली.

नाशिक : देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याची मोठी (Onion Arrival) आवक दाखल होत असल्याने गेल्या दहा दिवसात लासलगाव बाजार समिती कांद्याच्या दरात 2500 रुपयांची मोठी घसरण झाली. कांद्याचे 05 हजार रुपयांच्यावर असलेले कमाल दर 2500 रुपयापर्यंत तर सरासरी दर 1500 रुपयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 

दोन दिवसात कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क (Onion Export Duty) हटवण्याची तसेच गेल्या दहा दिवसापासून विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटलला अनुदान द्यावे, ही मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र असे रेल रोको, जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यातूनच लासलगाव (Lasalgaon Kanda Market) कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून आपला संताप व्यक्त केला. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सकाळच्या सत्रात 800 वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली. या कांद्याला जास्तीत जास्त 2501 रुपये, कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला. शिवाय जिल्ह्यातील इतरही बाजारात कांदा बाजारभाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले. अचानक कांद्याचे लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमरणा, मनमाड, येवला यासह प्रमुख सर्वच पंधरा बाजार समितीत तसेच अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धुळे, छत्रपती संभाजी नगर आणि गुजरात, मध्यप्रदेश दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने काढण्यात येत असलेल्या लाल कांद्याची आवक होत आहे. यामुळे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्या कारणाने कांद्याच्या दरामध्ये घसरण होत आहे. यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्णयतीवरील 20 टक्के निर्यातशुल्क रद्द केले पाहिजे. - जयदत्त होळकर, कांदा उत्पादक शेतकरी 

लाल कांद्याचे उत्पादन पाहता प्रती किलो मागे 15 ते 20 रुपये इतका खर्च आला आहे. आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून चार महिने कांद्याचे पालन पोषण केल्यानंतर फक्त उत्पादन खर्च मिळणार असेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा मोठा प्रश्न आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकारने प्रती किलो मागे 20 रुपये अनुदान द्यावे. - सुभाष झाल्टे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक