Jwari Kharedi : नाफेडमार्फत ज्वारी खरेदी सुरू झाली असली तरी अनेक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी अजूनही खरेदी झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातल्या ज्वारीचा साठा खराब होण्याची भीती व्यक्त होत असून, शासनाने तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.(Jwari Kharedi)
खुल्या बाजारात ज्वारीचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने नाफेडमार्फत ज्वारी खरेदी सुरू केली. (Jwari Kharedi)
मात्र, अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही त्यांची ज्वारी अद्याप खरेदी करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.(Jwari Kharedi)
३० शेतकऱ्यांचीच खरेदी, बाकींची ज्वारी रखडली
२०२४-२५ या हंगामात शेकडो शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ३० शेतकऱ्यांचीच ज्वारी नाफेडने खरेदी केली.
उर्वरित शेतकऱ्यांना कोणताही संदेश किंवा खरेदीसंदर्भात माहिती मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संभ्रमाचा सामना करावा लागत आहे.
साठवलेली ज्वारी खराब होण्याचा धोका
ज्वारी खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात अजूनही मोठ्या प्रमाणावर ज्वारी साठवून ठेवलेली आहे. पावसाळ्यामुळे साठवणुकीत अडचणी येत असून, ज्वारी खराब होण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत तातडीने ज्वारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनावर सुनील बरडे, विठ्ठल मलकापुरे, प्रदीप बरडे, चंद्रकांत खंगार, श्याम केवटे, संजय गवळी, गजानन गवळी, राजेंद्र कोठारी, हरीष कोठारी, गौतम चोरडिया, महेंद्र ढवळे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, सर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी तातडीने खरेदी करावी, अन्यथा आम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल.