Jowar Market : अमरावती बाजार समित्यांमध्ये ज्वारीला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्चही पडत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.(Jowar Market)
शासनाने यावर्षी ज्वारीसाठी प्रति क्विंटल ३ हजार ६९९ रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष बाजारात मात्र ज्वारीला केवळ १ हजार ५०० ते १ हजार ९०० रुपये दर मिळत आहे.(Jowar Market)
या तफावतीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, त्याचा थेट परिणाम रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रावर होताना दिसत आहे.(Jowar Market)
अमरावती जिल्ह्यात पूर्वी खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखली जाणारी ज्वारी आता बाजारपेठेत पूर्णतः दुर्लक्षित होत आहे.(Jowar Market)
मागील काही वर्षांत खते, बियाणे, कीटकनाशके आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच पावसाची अनिश्चितता कायम असल्याने ज्वारीचे उत्पादन अधिक जोखमीचे बनले आहे. एवढा खर्च करूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.(Jowar Market)
बाजारात ज्वारीचे मातीमोल दर
जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ज्वारीचे दर सातत्याने कमी पातळीवर आहेत.
१० डिसेंबर : १,४५० ते १,९०० रुपये
२९ डिसेंबर : १,५०० ते १,८५० रुपये
३१ डिसेंबर : १,४५० ते १,८५० रुपये
०७ जानेवारी : १,५०० ते १,९०० रुपये
०९ जानेवारी : १,५०० ते १,९०० रुपये
या दरांवर ज्वारी विक्री केल्यास शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पेरणी क्षेत्रात घट
दरातील घसरण, वाढलेला उत्पादन खर्च आणि हमीभावाचा लाभ न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा रब्बी ज्वारीची पेरणी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. काही शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत असून, तर काहींनी शेतीत गुंतवणूकच कमी केली आहे. परिणामी, जिल्ह्यात ज्वारीचे लागवड क्षेत्र झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे.
ज्वारी पीक हद्दपार होण्याची भीती
जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर ज्वारीसारखे पारंपरिक आणि पोषणमूल्यांनी समृद्ध पीक हळूहळू जिल्ह्यातून हद्दपार होण्याची भीती शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शासनाने हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी करावी, खरेदी केंद्रे वाढवावीत आणि बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
