उपासमारीचा सामना करण्याच्या उद्देशाने जागतिक मानवतावादी कार्याच्या समर्थनार्थ तांदळाच्या पुरवठ्यासाठी, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली.
भारत सरकारच्या एफसीआयचे सीएमडी रवींद्र कुमार अग्रवाल आणि डब्ल्यूएफपीचे उपकार्यकारी संचालक कार्ल स्काऊ यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सामंजस्य करारानुसार, एफसीआय डब्ल्यूएफपीला २ लाख मेट्रिक टन (२५% पर्यंत तुकडा) तांदूळ पुरवेल.
हा सामंजस्य करार स्वाक्षरीच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल आणि परस्पर संमतीने त्याला मुदतवाढ देता येईल. सध्याची किंमत ३१ मार्च २०२६ पर्यंत २८०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करून, तांदळाच्या किमतीला वार्षिक आधारावर परस्पर सहमती दर्शवली जाईल.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा म्हणाले: “डब्ल्यूएफपी बरोबरच्या आमच्या भागीदारीद्वारे, आम्ही उपासमारीचा सामना करणाऱ्यांना आशा, पोषण आणि सन्मान निर्यात करत आहोत. या करारातून कोणीही उपाशी राहणार नाही, याची खात्री करण्याचा भारताचा संकल्प दिसून येतो. कुपोषण आणि अन्न सुरक्षेच्या विरोधात लढा देण्यासाठी भारत यापुढेही आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर खंबीरपणे उभा राहील.”
संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रमाचे उपकार्यकारी संचालक कार्ल स्काऊ म्हणाले :
"भारताबरोबरचा हा करार जागतिक उपासमारी बरोबरच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या पाठिंब्यामुळे जागतिक अन्न कार्यक्रमा अंतर्गत येत्या पाच वर्षांत, असुरक्षित लोकसंख्येपर्यंत पौष्टिक अन्न अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यात सहाय्य मिळेल. एक प्रमुख कृषीप्रधान राष्ट्र आणि जागतिक एकतेचा पुरस्कर्ता म्हणून, भारत आपल्याला शून्य उपासमारीचे ध्येय कृतीत उतरवण्याची प्रेरणा देतो. या परिवर्तनकारी भागीदारीबद्दल मी भारताचे आभार मानतो."
ही भागीदारी जागतिक अन्न सुरक्षेसाठी भारताची वचनबद्धता अधिक दृढ करते तसेच जगभरातील मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाबरोबरचे सहकार्य मजबूत करते आणि जागतिक अन्न प्रणालींमध्ये विश्वासार्ह आणि जबाबदार योगदानकर्ता म्हणून भारताची भूमिका बळकट करते.
Gas Leak : जर तुमच्या घरातून एलपीजीचा वास येत असेल तर पहिल्यांदा हे काम करा, वाचा सविस्तर
