जळगाव : केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या कापसावर १ जानेवारीपासून ११ टक्के आयात शुल्क लागू केल्यामुळे देशांतर्गत कापूस बाजारात तेजी परतली आहे. खान्देशात क्विंटलला ७१०० रुपयांवर स्थिरावलेले दर आता ७४०० ते ७६०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, यामुळे कापूस कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केले होते. परिणामी, देशातील टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि व्यापारी बाहेरून येणाऱ्या स्वस्त कापसाला पसंती देत होते. याचा मोठा फटका स्थानिक कापूस दराला बसला होता. मात्र, नवीन वर्षात हे शुल्क पुन्हा ११ टक्के केल्याने आता परदेशी कापूस महाग झाला असून, देशांतर्गत कापसाची मागणी अचानक वाढली आहे.
संक्रांतीनंतर आवक वाढण्याचा अंदाज
सध्या खासगी बाजारात ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली असली, तरी येत्या काही दिवसांत हे दर अधिक वधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मकर संक्रांतीपर्यंत बाजारपेठ स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, संक्रांतीनंतर मार्केटचा कल आणि वाढलेले दर पाहून शेतकरी घरांमध्ये साठवून ठेवलेला कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर काढण्याची शक्यता असून, बाजारात आवक वाढेल.
खासगी बाजारात चुरस वाढणार
कापसाचे दर खालावल्यामुळे शेतकरी आतापर्यंत कापूस 'सीसीआय'च्या केंद्रांवर नेण्याला प्राधान्य देत होते. मात्र, सीसीआयमध्ये ग्रेडिंग आणि ओलाव्यासारख्या अनेक जाचक निकषांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. आता खासगी बाजारात दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी पुन्हा खासगी व्यापाऱ्यांकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे खासगी जिनर्सनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
आयात शुल्क वाढवल्याने कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे खासगी बाजारात कापसाची आवक वाढू शकते. मात्र, पुढे कापसाचे दर कसे राहतील? याबाबत अद्याप सांगणे कठीण आहे. मात्र, शेतकऱ्यांसह जिनर्सला देखील भाववाढीमुळे दिलासा मिळाला आहे.
- प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन
