अमरावती : शासन, प्रशासन आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांच्या पराकोटीच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने ठरविलेला हमीभाव मिळविण्यातही अडचणी येत आहेत. दिवाळी सणानिमित्त बाजार समितीत सोयाबीन आल्यानंतर पुन्हा एकदा हाच अनुभव आला. याप्रकरणी प्राध्यापक असलेले विजय कुळकर्णी यांचा अनुभव विदारक आहे.
कुळकर्णी यांनी उत्तम प्रतवारी असलेले सोयाबीन विकण्यासाठी अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीत आणले होते. योग्य भाव न मिळाल्याने त्यांनी ते बाजारातच ठेवण्याचा निर्णय घेतला. इतर बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन हे आकाराने लहान दाण्याचे असून अतिशय कमी उतारा त्यांना मिळालेला आहे. त्यांच्याकडील सोयाबीन संगनमतानेच भाव पाहून घेतले जात असल्याचे त्यांनी याचि देही याचि डोळा अनुभवले.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जागा कुठे?
अमरावती कृषी उत्पन्न कारभार पावसाने उघडा केला. पुरेसे शेड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजार समितीचा भोंगळ ओले झाले. आवारातील रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले असून त्यामधून गज डोकावत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पोत्यावर चक्क स्लॅबच्या आउटलेट मधून पावसाच्या पाण्याची धार पडत होती. काहींचे सोयाबीन रस्त्यावरच ओलेगच्च झाले.
मॉइश्चरचे कारण पुढे करत व्यापारी करतात दरात घट
सोयाबीन विकत घ्यायला येणारे व्यापारी घोळक्याने येतात. सुरुवातीला दोन-तीन जणांचा घोळका येतो. गंजीत दोनतीन ठिकाणी खोलवर हात खुपसतात. सोयाबीन खाली-वर करतो. नंतर गंजीतील दोनतीन सोयाबीनचे दाणे तोंडात टाकतात. मॉइश्चर असल्यामुळे कुणाच्या सोयाबीनला २५०० रुपये, तर कुणाच्या सोयाबीनला ३००० पेक्षा जास्त दर मिळणार नाही, असे जाहीर केले जाते. शेतकऱ्यांचा या प्रक्रियेत कुठेही सहभाग नसतो. मालवाहतूक, हमालीचा खर्च परवडण्यासारखा नसला तरी त्यातच शेतकरी राजा समाधान मानतो.
