Halad Market : मराठवाडा व विदर्भातील हळद खरेदी-विक्रीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीचा हंगाम सुरू झाला आहे. (Halad Market)
येथील संत नामदेव महाराज मार्केट यार्डमध्ये १८ फेब्रुवारी रोजी सुमारे १२ क्विंटल नवीन हळद विक्रीसाठी दाखल झाली. (Halad Market)
लिलावात या हळदीला सरासरी १३ हजार ५०० ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हळद उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ओलाव्याचा परिणाम; तरीही खरेदीदारांचा उत्साह
बुधवारी झालेल्या लिलावात नवीन हळदीत काही प्रमाणात आर्द्रता (ओलावा) असल्याने दर मर्यादित राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मात्र, हळदीचा दर्जा उत्तम असल्याने खरेदीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. ओलावा कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जुन्या हळदीचे काय?
अनेक शेतकऱ्यांकडे गतवर्षीची हळद अद्याप शिल्लक आहे. सध्या जुन्या हळदीला १४ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
नवीन हळदीची आवक वाढल्यानंतर जुन्या मालाचे दर टिकून राहतील की घसरणार, याबाबत व्यापारी साशंक आहेत. मात्र शेतकरी नवीन हंगामात समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
१६ हजारांचा टप्पा गाठणार?
सध्या बाजारभाव १३ ते १४ हजारांच्या दरम्यान असले तरी येत्या काही दिवसांत तेजी येण्याचा अंदाज आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, ओलावा कमी होत जाईल आणि आवक स्थिरावेल तसा दर १६ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. हा अंदाज खरा ठरल्यास मागील काही महिन्यांपासून अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल.
लागवड खर्च अधिक; किमान १५–१६ हजारांची अपेक्षा
हळद पिकाचा लागवड खर्च इतर पिकांच्या तुलनेत चार ते पाच पट अधिक असल्याचे शेतकरी सांगतात.
बियाणे, मजुरी, खत, औषधे आणि साठवणूक यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे किमान १५ ते १६ हजार रुपये दर मिळाल्याशिवाय हळद विक्री परवडत नसल्याचे उत्पादकांचे मत आहे.
मार्च–एप्रिलमध्ये आवक वाढणार
हिंगोली बाजारपेठेत मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतून हळदीची आवक होते. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान दररोज चार ते पाच हजार क्विंटल हळद बाजारात दाखल होते.
सध्या आवक कमी प्रमाणात असली तरी मार्च-एप्रिलपासून हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून बाजारातील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच समाधानकारक दर मिळाल्याने 'पिवळ्या सोन्या'बाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही आठवडे हळद बाजारासाठी निर्णायक ठरणार आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीचे दर कोसळले; आठवड्यातच 'इतक्या' रुपयांची घसरण वाचा सविस्तर
