हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या आठवडाभरापासून हळदीच्या दरात वाढ होत असल्याने बाजारात काही प्रमाणात आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवारी (१ जानेवारी) हिंगोली बाजारात तब्बल १ हजार १२५ क्विंटल हळद विक्रीसाठी दाखल झाली. (Halad Market)
हिंगोली व वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या हळद खरेदी-विक्रीसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. हळदीच्या हंगामात या दोन्ही ठिकाणी दररोज चार ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत असते. मात्र सध्या हळदीचा हंगाम संपत आला असून, बाजारात सरासरी एक हजार क्विंटलच्या आसपास आवक होत आहे.(Halad Market)
गुरुवारी दाखल झालेल्या हळदीला किमान १४ हजार ३०० रुपये ते कमाल १६ हजार ९०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दरात झालेल्या वाढीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दर्जेदार आणि चांगल्या प्रतिच्या हळदीला व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी असल्याचेही चित्र बाजारात दिसून आले.
दरम्यान, बाजारात सोयाबीनची आवकही सुरूच असून, गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५२५ रुपये प्रती क्विंटल दर मिळत असून, चांगल्या दर्जाच्या सोयाबीनची कमाल विक्री ४ हजार ८०० रुपयांपर्यंत होत आहे.
तसेच, तुरीची आवक सध्या मंदावलेली असून, दररोज केवळ ५० ते ६० क्विंटल तूर बाजारात येत आहे. तुरीला सध्या सरासरी ६ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. येत्या आठवडाभरात नवीन तूर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे तुरीच्या आवकेत वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
