Halad Market :वाशिम जिल्ह्यातील हळद बाजारात चालू आठवड्यात मोठी उलथापालथ झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावात कान्डी हळदीच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल २ हजार ३०० रुपयांची, तर गटू हळदीच्या दरात १ हजार ९०० रुपयांची घसरण नोंदवली गेली.(Halad Market)
दरातील या अचानक घसरणीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत बाजारातील आवक कमी केली.
दरात आठवडाभरात मोठी घसरण
गत आठवड्यात (६ फेब्रुवारी)
कान्डी हळद: १२,५०० ते १५,२०० रुपये प्रति क्विंटल
गटू हळद: ११,६०० ते १४,००० रुपये प्रति क्विंटल
चालू आठवड्यात (१३ फेब्रुवारी)
कान्डी हळद: १०,२०० ते १२,७०० रुपये प्रति क्विंटल
गटू हळद: ९,७०० ते ₹१२,७२५ रुपये प्रति क्विंटल
यामुळे कान्डी हळदीत २,३०० रुपये तर गटू हळदीत १,९०० रुपयांची घसरण झाली आहे.
आवक ३०० वरून ७० क्विंटलवर
दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली हळद परत नेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, मागील आठवड्यात सुमारे ३०० क्विंटल हळदीची आवक झाली होती, तर यावेळी ती घटून फक्त ७० क्विंटल इतकीच नोंदवली गेली.
वाशिम बाजाराला पसंती
वाशिम बाजार समितीत योग्य दर आणि तत्काळ चुकारे मिळत असल्याने अकोला, बुलढाणा, खामगाव, पुसद, यवतमाळ तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी येथे हळद विक्रीसाठी येतात. मात्र, सध्याच्या घसरणीमुळे शेतकरी सावध झाले असून पुढील आठवड्यातील दरांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांसमोर चिंता
दरातील घसरण कायम राहिल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी साठवणूक करून बाजारस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
हळदीच्या दरातील ही घसरण तात्पुरती आहे की पुढील काळातही दर दबावात राहणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Bajarbhav : हरभऱ्याला मिळतोय का एमएसपी दर; जाणून घ्या सविस्तर
