Halad Market : वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात हळदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, २२ डिसेंबर रोजी दर्जेदार हळदीला प्रतिक्विंटल २० हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. (Halad Market)
दीर्घकाळापासून मंदीचे सावट असलेल्या हळद बाजारात अचानक आलेल्या या तेजीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Halad Market)
गेल्या जवळपास वर्षभरापासून हळदीच्या दरात अपेक्षित वाढ दिसून येत नव्हती. मात्र, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हळदीचे दर सातत्याने वधारू लागले आहेत. (Halad Market)
सोमवारी मोंढ्यात झालेल्या लिलाव (बिटा) प्रक्रियेत उत्तम दर्जाच्या हळदीने २० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. दरवाढीमुळे बाजारात हळदीची आवक वाढताना दिसून येत आहे.
उत्पादन घटल्याचा थेट परिणाम बाजारभावावर
हळदीच्या या भाववाढीमागे उत्पादनातील संभाव्य घट हे प्रमुख कारण असल्याचे व्यापारी व तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या शेतात असलेल्या हळद पिकावर 'करपा' आणि 'हुमणी' या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. या रोगांमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्यामुळे येत्या काळात नवीन हळद बाजारात कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
साठवणूक केलेल्या हळदीला मोठी मागणी
नवीन मालाच्या उपलब्धतेबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे सध्या साठवणूक करून ठेवलेल्या तसेच बाजारात येणाऱ्या हळदीला मोठी पसंती मिळत आहे.
दर्जा चांगला असलेल्या हळदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत असून, याचा थेट फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.
वर्षभराच्या मंदीनंतर बाजारात तेजी
वर्षभर हळद बाजारावर मंदीचे सावट होते. खर्च वाढूनही दर अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत होते. मात्र, आता बाजारात आलेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आगामी काळात दर टिकून राहावेत, अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
