Halad Market : गेल्या काही महिन्यांपासून हळदीच्या बाजारभावात अस्थिरता पाहायला मिळत होती. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. (Halad Market)
मात्र, ३१ ऑक्टोबर रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला विक्रमी भाव मिळताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.(Halad Market)
या दिवशी बाजारात तब्बल २ हजार १५० क्विंटल हळदीची आवक नोंदविण्यात आली.मागील काही महिन्यांपासून भावात अस्थिरता असतानाही आता हळदीने पुन्हा एकदा सोन्यासारखी चमक दाखवली आहे.(Halad Market)
कांडी हळदीचा दर किमान ११ हजार ३७० रुपये ते कमाल १३ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल, तर गहू हळदीचा दर १० हजार १०० रुपये ते १३ हजार ९०० रुपये प्रती क्विंटल असा नोंदविला गेला.
दरवाढीने आशा उजळल्या
हळदीच्या भाववाढीमुळे अलीकडच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वाशिम व परिसरातील शेतकरी प्रामुख्याने हळद, सोयाबीन, कापूस आणि हरभरा या पिकांवर अवलंबून आहेत.
यंदा मान्सून अनिश्चित राहिल्याने उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे हळदीच्या भाववाढीने पुन्हा नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
शेतकरी वर्गात आता चर्चा सुरू आहे की पुढील काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही व्यापाऱ्यांनीही बाजारात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले.
बाजार समिती परिसरात व्यवहारांना वेग
हळदीचा दर वाढल्याने बाजार समिती परिसरात खरेदी-विक्रीचे व्यवहार दिवसभर उत्साहात पार पडले. व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. दरवाढीमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी हळदीचा दर ८ ते ९ हजार रुपयांपर्यंत घसरला होता. उत्पादन खर्च भागवणेसुद्धा अवघड झाले होते; पण आता दर ११ ते १३ हजार रुपयांवर गेला आहे. ही चांगली चिन्हे आहेत. सरकारने निर्यात सुलभ केल्यास दर आणखी वाढतील. - गणेश गोटे, हळद उत्पादक शेतकरी
असे मिळाले दर
| हळदीचा प्रकार | किमान दर (₹/क्विंटल) | कमाल दर (₹/क्विंटल) | आवक (क्विंटल) |
|---|---|---|---|
| कांडी हळद | ११,३७० | १३,४०० | २१५० |
| गहू हळद | १०,१०० | १३,९०० | — |
हळदीच्या या दरवाढीने वाशिम बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून कमी भावाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पुढील काळात दरवाढ कायम राहील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
