Halad Market : हळदीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, गेल्या दीड वर्षापासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या हळद बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजी परतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Halad Market)
६ जानेवारी रोजी झालेल्या लिलावात हळदीला प्रतिक्विंटल १७ हजार ते १९ हजार रुपये इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Halad Market)
गेल्या वर्षभरात हळदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. अनेक वेळा अपेक्षेप्रमाणे भाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत होते. (Halad Market)
काही शेतकऱ्यांनी तर योग्य दराच्या प्रतीक्षेत आपली हळद विक्री न करता साठवून ठेवली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून बाजारात हळदीला मागणी वाढू लागल्याने दरात सुधारणा होत असून, मंगळवारी झालेल्या लिलावात हळदीने चांगलीच झेप घेतली.(Halad Market)
हळदीची आवक वाढली
दीड वर्षांपासून योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली हळद आता बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. दर वाढल्याने वसमत मोंढ्यात हळदीची आवक वाढताना दिसत असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. चांगल्या प्रतीच्या हळदीला बाजारात विशेष मागणी असल्याचे चित्र आहे.
सरासरी व उच्चांकी दर
६ जानेवारीच्या लिलावात हळदीला सरासरी १५ हजार ६०० रुपये दर मिळाला, तर उच्चांकी दर १९ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवण्यात आला.
विशेष बाब म्हणजे, यावेळी हळद कांडी आणि बंड्या या दोन्ही प्रकारांना जवळपास समान आणि चांगला दर मिळाला. त्यामुळे सर्वच प्रकारच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२० हजारांचा टप्पा पार करण्याचे संकेत
सध्या बाजारात जुन्या हळदीचीच आवक सुरू आहे. साधारण दोन महिन्यांनंतर नवीन हळद बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. नवीन हळद येण्यापूर्वीच दरात झालेली ही वाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.
व्यापारी आणि बाजारातील जाणकारांच्या मते, हळदीला असलेली वाढती मागणी आणि मर्यादित आवक लक्षात घेता, येत्या काळात हळदीचे दर २० हजार रुपयांचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
वसमत बाजार समितीत हळदीच्या दराने घेतलेली झेप ही शेतकऱ्यांसाठी आशादायक असून, दीर्घकाळानंतर हळद उत्पादकांना समाधानकारक दर मिळत असल्याने आगामी काळात बाजारात अधिक तेजी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
