Green Chili Market : यंदा हिरव्या मिरचीच्याबाजारभावात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता ओसंडून वाहते आहे. गतवर्षी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलेले दर यंदा फक्त २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांवर आले आहेत. (Green Chili Market)
दर घसरल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही, अशी हतबल प्रतिक्रिया मिळत आहे.(Green Chili Market)
मिरचीचे भाव कोसळले
वरूड आणि मोर्शी तालुक्यात गेल्या काही वर्षांत हिरव्या मिरचीच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लाल किंवा वाळवलेल्या मिरचीऐवजी शेतकरी थेट हिरवी मिरची बाजारात विकण्यावर भर देतात. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा तोटा वाढला आहे.
मोर्शी, आर्वी, आष्टी (शहीद), चांदूर बाजार, पांढुर्णा आदी ठिकाणांहून दररोज १४ ते २० ट्रक मिरचीची आवक राजुरा बाजारात होत आहे. गेल्या महिन्याभरापासून दर क्विंटलमागे १ हजार ८०० ते २ हजार ८०० रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत.
उत्पादन खर्चही निघत नाही
मिरची पक्व झाल्यानंतर झाडावर अधिक दिवस ठेवता येत नाही. लाल होण्यापूर्वीच तोडून विकावी लागते. त्यामुळे दर कमी असतानाही शेतकऱ्यांना विक्री करावी लागते.
मिरची पीक खर्चीक आहे. मजूर किमान दिवसभरात २५ ते २८ किलो मिरची तोडतो, त्यासाठी ४०० रुपयांहून अधिक मजुरी द्यावी लागते. बाजारात बेभाव विकावी लागत आहे. किमान ४० रुपये किलो दर मिळावा, ही अपेक्षा आहे. - अर्जुन राऊत, शेतकरी, चिंचरगव्हाण
आवक वाढली, मागणी कमी
देशातील मिरचीचे दर आंतरराज्य बाजारावर अवलंबून असतात. हिरवी मिरची साठवता येत नाही. आवक आणि मागणी यामध्ये तफावत वाढल्याने दर घटले आहेत. - मुन्ना चांडक, व्यापारी, राजुरा
शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी शासनाकडे किमान हमीभाव जाहीर करण्याची, तसेच बाजारात मिरची उत्पादकांसाठी संरक्षणात्मक योजना राबविण्याची मागणी केली आहे. कारण मिरची हे दीर्घकालीन आणि खर्चीक पीक असून, दरातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी तोट्याचा सामना करावा लागतो.
आवक आणि दर
गतवर्षी भाव : ११ हजार क्विंटल
यंदा भाव : २ हजार ५०० ते २ हजार ८०० क्विंटल
आवक : दररोज १४–२० ट्रक
हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; जाणून घ्या कसा मिळाला दर