नाशिक : जिल्ह्यात फुलांची लागवड विक्रमी प्रमाणात करण्यात येते, दिवाळीतदेखील फुलांच्या भावाने उसळी घेतली नसल्याचे जाणवते. लक्ष्मी पुजनासाठी फुलांचा बाजार सजला असून केवळ १२० ते १३० रुपये शेकडा याप्रमाणे झेंडूच्या फुलांचे दर रविवारी होते.
सध्या दिवाळीचे दिवस असून या काळात फुलांना प्रचंड मागणी असते. आता बाजारात पुढील २४ तासात आवक दुपटीने वाढणार असून, भाव ८० ते १०० रुपये शेकडा होईल, असा अंदाज फुलविक्रेता भारत उडान यांनी व्यक्त केला. मोगऱ्याच्या फुलांची एक हजार रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर इतर फुलांची आवक चांगली असून भाव शंभर रुपये शेकडा होता.
यंदाच्या दसऱ्याला फुलांचे दर कोसळल्याने फुल उत्पादक संकटात सापडले होते. तीच तऱ्हा दिवाळीतही असल्याने फुल उत्पादक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातून बडोदा, मुंबईच्या बाजारपेठेत फुलांची निर्यात होत असते. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातून चार ते पाच टन फुले बाहेर पाठविण्यात आले, मात्र तरी देखील स्थानिक बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची कमतरता भासणार नाही, असे फुल विक्रेत्यांनी सांगितले.
फुलांचे दर कसे आहेत?
झेंडू : यंदा - १०० रुपये शेकडा, मागील वर्षी - १५० रुपये शेकडा
शेवंती : यंदा - १४० रुपये किलो, मागील वर्षी - २५० रुपये किलो
मोगरा : यंदाचे दर १००० रुपये किलो, मागील वर्षी ९०० रुपये किलो
निशिगंधा : यंदा - २०० रुपये किलो, २०० रुपये किलो
गुलाब : यंदा - ३० रुपये गड्डी, मागील वर्षी ५० रुपये गड्डी
जरबेरा : यंदा - १०० रुपये बंडल, मागील वर्षी - १३० रुपये बंडल