नाशिक :द्राक्षांचा हंगाम (Grape Season) पुढच्या पंधरा दिवसात संपणार असून, बाजारातून द्राक्ष निरोप घेतील, तर विदेशातील निर्यातही जवळपास संपली आहे. ३० एप्रिलअखेर नाशिक जिल्ह्यातून (Nashik Grape Export) १ लाख ५६ हजार ३५९ मेट्रिक टन द्राक्ष समुद्रमार्गे ११ हजार ५९ कंटेनरद्वारे विदेशात पोहोचली असून, ४० कंटेनर प्रतीक्षेत आहेत. २२ ते २५ टक्के द्राक्ष निर्यात मागील (Grape Export Down) वर्षीच्या तुलनेने घटली आहे. त्यामुळे भारतात येणारे तितकेच परकीय चलनही बुडाले.
किरकोळ बाजारात द्राक्ष १२० ते १४० रुपये किलो मिळत असून, पूर्ण सिझनमध्ये भाव (Grape Market) वाढतेच होते. गत तीन वर्षात द्राक्षांचे दर यंदा सर्वाधिक राहिले. वातावरणात कधी कधी ढगाळ, तर कधी कोरडेपणा असल्याने द्राक्ष दहा ते पंधरा दिवस अगोदरच पक्व होत राहिले. ते यावर्षी जवळपास दोन आठवडे लवकर बाजारात आले होते.
रशिया, मलेशिया अन् संयुक्त अरब अमिरातीसाठी महिनाभरात ५५० कंटेनर रवाना झाले. मात्र, ही आकडेवारी गत वर्षीच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे भारताचे परकीय चलन कमी झाले. त्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्याला बसला. भाव वाढते असल्याने अनेकांना मनसोक्त द्राक्ष खाता आले नाही. वातावरणात होत असलेला सततचा बदल द्राक्ष बागांवर परिणाम करणारा ठरला. जगभरात नाशिकच्या द्राक्षांना मागणी जास्त असताना त्या तुलनेत मालाचा पुरवठा कमी असल्याने चार महिन्यांच्या पूर्ण हंगामात दरात तेजी दिसून आली.
यंदाही ९१ टक्के वाटा
कृषी विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा देशभरात द्राक्ष उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. तर देशातील एकूण निर्यातीमध्ये नाशिकचा वाटा २१ टक्के यंदाही राहिला. जिल्ह्यात १३ तालुक्यांत ५८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवडी आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड हे प्रमुख उत्पादक तालुके आहेत.
....या देशांमध्ये निर्यात
रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकची द्राक्ष निर्यात होतात. मात्र, यंदादेखील सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत. नाशिकच्या द्राक्षांना सर्वत्र पसंती असते.
दोन मुख्य वाण
नाशिकमध्ये प्रामुख्याने थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, शरद सीडलेस, क्रीमसन सीडलेस आणि रेडग्लोब या द्राक्ष वाणांची लागवड आणि निर्यात केली जाते. युरोप खंडातील देशांमध्ये या द्राक्षांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कंटेनर वाढत असतात.
यंदा किती झाली निर्यात
2023-24 वर्षी म्हणजेच गत हंगामात युरोप खंडात एक लाख 18 हजार 195 मेट्रिक टन इतकी द्राक्षांची निर्यात झाली. यात 8759 कंटेनरचा समावेश आहे. तर नॉन युरोपियन देशांमध्ये 38,709 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात होऊन 2 हजार 514 कंटेनरचा यात समावेश आहे. अशी एकूण एक लाख 56 हजार 905 मीटर इतकी निर्यात झाली होती.
तर यंदा म्हणजेच 2024-25 चालू हंगामात निर्यात झालेली द्राक्ष आकडेवारी पाहता युरोप खंडात 01 लाख 10 हजार 163 मेट्रिक टन निर्यात होऊन 08 हजार 167 कंटेनरचा यात समावेश आहे. तसेच नॉन युरोपियन देशांमध्ये 46,195 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. अशी एकूण एक लाख 56 हजार 338 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.