जळगाव : रब्बी हंगामाची काढणी सुरू होताच जळगाव बाजार समितीमध्ये मालाची मोठी आवक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यंदा गहू, हरभरा व मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी 'दादर' चे क्षेत्र घटले होते.
१६ मार्च रोजी बाजार समितीत दादरला शासनाच्या ३ हजार ४२१ रुपयांच्या हमीभावापेक्षा तब्बल २ हजार रुपये जादा, म्हणजेच ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. यंदा दादरची लागवड कमी झाल्याने बाजारात आवक मर्यादित आहे. मात्र, मागणी मोठी असल्याने दादरच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
बाजारातील या दरामुळे दादर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, मंदीच्या काळात ही वाढ शेतकऱ्यांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. एका दिवसात बाजार समितीत १७०० क्विंटल दादरची आवक झाली होती.
हरभरा आणि सोयाबीनची स्थिती
हरभरा : हरभऱ्याची आवक ७०० क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. सामान्य गुलाबी हरभऱ्याचे दर ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांपर्यंत स्थिर आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारीत हेच दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले होते.
मेक्सिको हरभरा : या उच्च दर्जाच्या हरभऱ्याला ७ हजार ६०० ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान चांगला भाव मिळत आहे.
सोयाबीन : सोयाबीनची आवक काही प्रमाणात सुरू असून, सध्या ५ हजार ३४५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे.
गहू : नवीन गव्हाची आवक कमी असून, गव्हाला बाजार समितीत २ हजार ३५० रुपयांचा भाव मिळत आहे.
यंदा जिल्ह्यात गहू, हरभरा आणि मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती, त्या तुलनेत दादरचे क्षेत्र कमी राहिले. आता नवीन माल बाजारात येत असून, दादरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने दरात ही मोठी वाढ झाली आहे.
- कैलास शिंदे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव.
आधुनिक तंत्रज्ञानाने हरभरा शेती, दोन एकरांत 17 किलो बियाणे पेरले, हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन आले!
