Cotton Market Update : वणी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत आजपासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू होत आहे.
मात्र, कापसातील आर्द्रतेच्या प्रमाणावर दरात कपात होणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
कापूस खरेदीसाठी आवश्यक प्रक्रिया
केंद्र सरकारने यावर्षी सीसीआयमार्फत आधारभूत दराने (MSP) कापसाची खरेदी सुरू केली आहे. यासाठी 'कपास किसान' अॅपद्वारे नोंदणी बंधनकारक असून, शेतकऱ्यांना त्यांच्या नावाने आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ 'अ' नमुना व स्वतः चा फोटो अपलोड करावा लागेल. नोंदणी झाल्यावर शेतकऱ्यांना विक्रीसाठी तारीख व वेळ निश्चित करून दिली जाणार आहे.
नोंदणी करताना मोबाईलवर येणारा OTP आवश्यक असून, त्याशिवाय अर्ज मान्य केला जाणार नाही.
हमीदर आणि आर्द्रतेवरील कपात नियम
सीसीआयने यंदा ८ हजार ११० रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे.
बन्नी ब्रम्हा : ८,११० रु.
बन्नी ब्रम्हा स्पेशल : ८,०६० रु.
एच-चार (H-4) : ८,०१० रु.
हे दर ८ टक्के आर्द्रता असलेल्या कापसासाठीच लागू असतील.
जर कापसातील आर्द्रता ८ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर दर प्रत्येक एक टक्का वाढीवर एक टक्का दर कपात करण्यात येईल.
सीसीआयने १२ टक्क्यांपर्यंतची आर्द्रता स्वीकार्य ठरवली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त आर्द्रता असेल, तर कापूस नाकारला जाण्याची शक्यता आहे.
स्लॉट बुकिंगची सोय
'कपास किसान ॲप'मध्ये शेतकऱ्यांना ७ दिवसांच्या रोलिंग आधारावर स्लॉट बुकिंग करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार दिवस ठरवता येणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी तारीख व वेळ निश्चित करून देण्यात येणार आहे. निश्चित केलेल्या वेळेत कापसाची खरेदी होणार आहे. - हेमंत ठाकरे, सीसीआय केंद्र प्रमुख.