Cotton Market : यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, बाजारातील कमी आवक आणि जागतिक तसेच देशांतर्गत पातळीवरील घडामोडींमुळे कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे.(Cotton Market)
मूर्तिजापूर तालुक्यात मध्यम धाग्याच्या कापसाचे दर थेट ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, खासगी व्यापाऱ्यांनी शासनाच्या कापूस महामंडळाच्या (CCI) हमीभावालाही मागे टाकले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकीकडे आनंद तर दुसरीकडे हळहळ व्यक्त होत आहे.(Cotton Market)
यंदाच्या हंगामात कापूस लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यातच कापूस आयातीवरील शुल्कवाढ, सरकीच्या दरात झालेली वाढ आणि बाजारात अपेक्षेपेक्षा कमी आवक यामुळे कापसाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे.(Cotton Market)
हंगामाच्या सुरुवातीला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांदरम्यान स्थिर असलेले दर आता थेट ८ हजार ४०० रुपयांपर्यंत गेल्याने पांढऱ्या सोन्याने पुन्हा एकदा चमक दाखवली आहे.(Cotton Market)
'सीसीआय'पेक्षा बाजारभाव जास्त
शासनाने २०२५-२६ हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार ७१० रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात प्रामुख्याने मध्यम धाग्याचा कापूस पिकवला जातो. 'सीसीआय'कडून हमीभावाने कापूस खरेदी सुरू असली, तरी बाजारपेठेत खासगी व्यापारी हाच कापूस ८ हजार १०० ते ८ हजार २०० रुपये, तर काही ठिकाणी ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी 'सीसीआय'ऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे वळताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांच्या पदरी हळहळ
दरवाढ होत असली तरी बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कापूस साठा आता संपत आला आहे. 'शेतकऱ्यांकडे माल असतो तेव्हा भाव नसतो आणि भाव वाढतात तेव्हा माल संपलेला असतो. मग ही दरवाढ नेमकी कुणासाठी?' असा संतप्त सवाल शेतकरी मुन्ना नाईकनवरे यांनी उपस्थित केला आहे.
सध्या मोजकेच शेतकरी असे आहेत, ज्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. परिणामी, वाढलेल्या दरांचा फायदा मोठ्या प्रमाणावर खासगी व्यापाऱ्यांनाच होणार असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे.
आठ हजारांचा टप्पा ओलांडला
आतापर्यंत कापसाचे दर ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांच्या आसपास फिरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांत अचानक दरवाढ होऊन प्रथमच आठ हजारांचा टप्पा ओलांडण्यात आला आहे.
बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, येत्या काळात मध्यम धाग्याच्या कापसाचे दर ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अद्याप कापूस साठा शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील दरवाढीकडे लागले आहे.
व्यापाऱ्यांना फायदा, शेतकरी अडचणीत
अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासलेला शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. आर्थिक अडचणींमुळे घरात आलेला कापूस तो तत्काळ विक्रीस काढतो. याचाच फायदा घेत खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवणूक करतात आणि दर वाढल्यानंतर विक्री करून भरमसाट नफा कमावतात.
'शेतात प्रचंड मेहनत करूनही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र काहीच पडत नाही. शासनाने या साठेबाजीवर आळा घालणे गरजेचे आहे.' अशी मागणी शेतकरी शरद गणोरकर यांनी केली आहे.
बाजार समितीतील आवक घटली
खासगी व्यापाऱ्यांनी 'सीसीआय'पेक्षा जास्त दर दिल्यामुळे शेतकरी 'सीसीआय'कडे कापूस आणण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर येथे येणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली. - रितेश मडगे, माहिती बाजार समितीचे सचिव.
एकंदरीतच कापसाच्या दरात झालेली ही मोठी वाढ बाजारासाठी सकारात्मक असली, तरी प्रत्यक्ष फायदा किती शेतकऱ्यांना होणार, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.
