Cotton Market : यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या दरांबाबत संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे 'सीसीआय'च्या (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) हमी खरेदी केंद्रावर कापसाला सेकंड ग्रेड लागू करण्यात आल्याने दरात घसरण झाली असताना, दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाच्या दरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. (Cotton Market)
सोमवारी जिल्ह्यातील खुल्या बाजारात कापसाच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Cotton Market)
हमी केंद्रात १०० रुपयांची घसरण
'सीसीआय'च्या हमी खरेदी केंद्रावर यंदा कापसासाठी सेकंड ग्रेड सुरू करण्यात आला आहे. यामुळे पूर्वी ८ हजार ११० रुपये क्विंटल असलेला दर घसरून ८०१० रुपये क्विंटल इतका झाला आहे. परिणामी हमी केंद्रात कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे १०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चांगल्या दर्जाचा कापूस असूनही त्याला कमी प्रतीचा ग्रेड दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
पूर्वीप्रमाणे कापसाचे ग्रेडिंग ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, केंद्र शासनाकडून या संदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना न आल्याने हमी केंद्रावर सध्या दुसरा ग्रेड लागू आहे.
खुल्या बाजारात दरवाढीचा जोर
हमी केंद्रातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, खुल्या बाजारात मात्र कापसाचे दर वधारले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात खुल्या बाजारात कापसाला याआधी ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळत होता.
सोमवारी त्यात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाल्याने कापसाचे दर ७ हजार ७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. ही दरवाढ कायम राहिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयात शुल्काबाबत चर्चा
दरम्यान, केंद्र शासनाने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क पूर्वी कमी केले होते. हे आयात शुल्क आता पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसिद्ध झालेली नाही.
आयात शुल्क पूर्ववत झाले तरी त्याचा बाजारावर फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे कृषी अभ्यासकांचे मत आहे.
सरकी, डॉलर आणि गठाणी दरांचा परिणाम
नववर्षात रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला असून, डॉलरचा दर ८५ रुपयांवरून ८९ रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय सरकीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, सरकीचे दर ३ हजार ४०० रुपयांवरून ३८०० रुपये क्विंटल इतके झाले आहेत. कापसाच्या गाठीच्या किमतीदेखील ५२ हजार रुपयांवरून ५४ हजार रुपये इतक्या वाढल्या आहेत.
या सर्व घटकांचा थेट परिणाम कापसाच्या बाजारभावावर झाला असून, त्यामुळेच खुल्या बाजारात कापसाच्या दरात वाढ नोंदवली गेल्याचे जाणकार सांगतात.
सरकीचे दर आणि कापसाच्या गाठीच्या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम कापसाच्या विक्रीवर झाला आहे. सोमवारी कापसाचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढून ७ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत. पुढील काळात गाठीच्या दरात आणखी वाढ झाल्यास कापसाचे दर आठ हजारांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. - सुभाष पवार, कापूस व्यावसायिक
आठ हजारांचा टप्पा गाठणार?
हमी केंद्रावरील ग्रेडिंगविषयी असलेली नाराजी कायम असली, तरी खुल्या बाजारातील दरवाढ, सरकीचे वाढते दर आणि डॉलरमधील मजबुती पाहता कापसाचे दर येत्या काळात ८ हजार रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष आगामी बाजार हालचालींकडे लागले आहे.
