Cotton Market : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापसाच्या दरात सकारात्मक हालचाल दिसून येत असून, खासगी बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये इतके वाढले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचा भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) हमी खरेदी केंद्रांऐवजी खासगी बाजारातकापूस विक्रीकडे कल वाढला आहे. (Cotton Market)
केंद्र शासनाच्या वतीने २०२५-२६ हंगामासाठी कापसाचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मध्यम स्टेपल कापसासाठी ७ हजार ७१० रुपये, तर लांब स्टेपल कापसासाठी ८ हजार ११० रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. (Cotton Market)
या दरांवर सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी खासगी बाजारात कापसाचे दर ७ हजार ते ७ हजार २०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी हमी केंद्रांवर कापूस विक्री करणे पसंत केले होते.(Cotton Market)
जानेवारीत दरात सुधारणा
जानेवारी महिन्यापासून खासगी बाजारात कापसाच्या मागणीत वाढ झाल्याने दरात पुन्हा सुधारणा झाली आहे.
मंगळवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा दर ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आला, तर अकोटसह काही खासगी बाजारांमध्ये हा दर थेट ८ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी पुन्हा खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
ग्रेडिंगबाबत संभ्रम
दरम्यान, हमी खरेदी केंद्रांवर कापसाचे ग्रेडिंग बदलण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पूर्वीप्रमाणे ग्रेडिंग पद्धत लागू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मात्र, या संदर्भात केंद्र शासनाकडून अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना न आल्याने सध्या हमी केंद्रांवर दुसरा ग्रेड लागू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकरी खासगी बाजाराला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
आयात शुल्कावर चर्चा
केंद्र शासनाने यापूर्वी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क कमी केले होते. आता हे शुल्क पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.
कृषी अभ्यासकांच्या मते, आयात शुल्क पूर्ववत झाले तरी देशांतर्गत बाजारावर त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
सरकीच्या दरांचा परिणाम
सरकी व गठाणीच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम कापसाच्या दरांवर झाला आहे. खासगी बाजारात सध्या मागणी वाढलेली असून, यामुळे पुढील काळात कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खासगी बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कापसाची मागणी वाढली असून, सरकीचे दरही चढे आहेत. त्यामुळे पुढील काळात दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. - राजकुमार रूंगटा, कापूस विपणन तज्ज्ञ
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाचे हमी दर घसरले; मात्र खुल्या बाजारात दरवाढ वाचा सविस्तर
