गजानन मोहोड
केंद्र शासनाने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क १ जानेवारीपासून पुन्हा लागू केल्यानंतर देशांतर्गत कापसाला मोठा दिलासा मिळाला आहे. (Cotton Market)
आयात कापसावर निर्बंध आल्याने आणि सरकीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने कापसाच्या दरांनी उसळी घेतली असून, बुधवारी अमरावती बाजारात पहिल्यांदाच कापसाचा दर ८ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर पोहोचला. (Cotton Market)
विशेष म्हणजे, ३८ टक्के झडती असलेला कापूस तब्बल ८ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
आयात शुल्क पूर्ववत केल्याने देशांतर्गत कापसाला उठाव
यापूर्वी केंद्र शासनाने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याने परदेशातून मोठ्या प्रमाणावर कापसाची आयात सुरू झाली होती. परिणामी देशांतर्गत कापसाच्या दरांवर दबाव निर्माण झाला आणि शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नव्हता.
या परिस्थितीत अनेक शेतकरी हमीभावाच्या संरक्षणासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडे वळले होते. मात्र, तेथेही आर्द्रतेचे कारण पुढे करत दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.
आता १ जानेवारीपासून आयात शुल्क पुन्हा लागू केल्याने परदेशी कापसाची आवक घटली असून देशांतर्गत बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत असून बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे.
सरकीच्या दरात तेजी, कापसाला बळ
कापसाच्या दरवाढीमागे सरकीच्या दरात आलेली तेजीही महत्त्वाची ठरत आहे. सध्या सरकीचे दर ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान पोहोचले आहेत. त्याचबरोबर रुईचे दरही १५५ रुपये प्रतिकिलो इतके आहेत. या सर्व घटकांमुळे कापसाला बाजारात चांगला उठाव मिळत आहे.
शेतकऱ्यांची साठवणूक, आवक घटली
दर आणखी वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकरी कापसाची साठवणूक करत आहेत. त्यामुळे बाजारात कापसाची आवक कमी झाली असून, मागणी वाढल्याने दरांना आणखी आधार मिळाला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, ही स्थिती काही काळ कायम राहिल्यास कापसाचे दर आणखी वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील कापसाचे सध्याचे दर (रु./क्विंटल)
कापसाचे दर : ७,९०० ते ८,१००
३८ टक्के झडती असलेला कापूस : ८,४०० ते ८,५००
सरकीचे दर : ४,२०० ते ४,३००
रुईचे दर : १५५ रुपये प्रतिकिलो
प्रमुख बाजारांतील कापसाचे भाव (रु./क्विंटल)
अमरावती : ७,९०० ते ८,१००
सावनेर : ७,८५० ते ७,९००
अकोला : ७,७८९ ते ८,०१०
वर्धा : ७,६०० ते ८,२००
घाटंजी : ७,७१५ ते ८,३००
हिंगणघाट : ७,५०० ते ८,३५०
दरवाढीचा 'सीसीआय'ला फटका
खुल्या बाजारात कापसाच्या दरांनी हमीभावाच्या पुढे झेप घेतल्याने जिल्ह्यातील सीसीआयच्या १५ खरेदी केंद्रांना मोठा फटका बसला आहे.
अमरावती येथील सीसीआय केंद्रावर यापूर्वी दररोज ६ ते ७ हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. मात्र सध्या ही आवक घटून केवळ ५०० ते १००० क्विंटल इतकीच राहिली आहे. खुल्या बाजारात जास्त दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआयकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
पुढील काळात काय?
तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क कायम राहिले, सरकीचे दर मजबूत राहिले आणि शेतकऱ्यांची साठवणूक सुरू राहिली तर कापसाचे दर आणखी वाढू शकतात. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि केंद्र शासनाचे पुढील धोरण यावरही कापसाच्या किमतींची दिशा ठरणार आहे.
