Cotton Market Bhav : राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून कापसाची आवक (Cotton Arrivals) वाढत आहे. परंतु, याच काळात भावात लक्षणीय घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Cotton Market Bhav)
मागील आठवड्याच्या तुलनेत कापसाच्या दरात सरासरी पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, यामुळे येणाऱ्या दिवसांत बाजारातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Cotton Market Bhav)
गुजरात बाजारात दर घसरले
गुजरातमधील राजकोट बाजारात मागील आठवड्यात कापसाची सरासरी किंमत ७ हजार २५१ रुपये प्रतिक्विंटल होती; मात्र सध्या दरात ४.२६ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे सध्याचे दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) कमी आहेत.
खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धागा कापसाचा एमएसपी ७ हजार ७१० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या बाजारात मिळणारा भाव ६ हजार ८०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
आवक वाढली, पण दर्जा घसरला
राष्ट्रीय स्तरावर कापसाच्या आवकबाबत विरोधाभासी चित्र दिसते आहे. देशभरात एकूण आवकमध्ये ४९.७७ टक्क्यांची घट झाली असली तरी महाराष्ट्रात मात्र आवक वाढलेली आहे.
पिकाची वेचणी सुरू झाल्याने राज्यातील बाजार समित्यांत नवीन कापूस दाखल होत आहे. तथापि, ऐन काढणी हंगामात झालेल्या पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे.
काही भागात ओलसर कापूस बाजारात येत असल्याने चांगल्या प्रतीच्या कापसाला मागणी असली तरी इतर दर्जाच्या कापसाचे दर कमी आहेत.
शेतकऱ्यांची नाराजी
कापसाचे उत्पादन हाती येत असतानाच दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
खर्च वाढतोय, मजुरी वाढली आहे, आणि दर मात्र कमी होत आहेत. अशा परिस्थितीत कापूस घेणे फायदेशीर राहत नाही, असे शेतकरी सांगतात.
काही शेतकरी सध्या माल साठवून ठेवण्याचाही विचार करत आहेत, कारण पुढील आठवड्यांत दरात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील बाजार समित्यांत कापसाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून मोठी हालचाल सुरू आहे. मात्र, दर घटल्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत. उत्पादन खर्च आणि विक्री भाव यातील तफावत वाढत असल्याने कापूस शेतीचा नफा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Bajra Market : थंडी सुरू होण्याआधीच मिळाला बाजरीला चांगला भाव वाचा सविस्तर
