Chinese Grapes : यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील बहुतांश द्राक्ष पट्ट्यातील द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी द्राक्ष काढणी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई मार्केटमध्ये थेट चीनची द्राक्ष दाखल झाली आहेत.
मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये चीन येथील शाईन मस्कत नावाची द्राक्षांची व्हरायटी दाखल झाली आहे. रेड ग्लोब, क्रिमसन, सफायर अशा चार प्रकारची द्राक्षे बाजारात आली आहेत. यातील शाईन मस्कत ही व्हरायटी सीडलेस असून खायला देखील चविष्ट आहे.
त्यामुळे चीनमधील द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. या पाच किलोच्या द्राक्ष पेट्यांना १५०० ते १६०० रुपये दर मिळत आहे. म्हणजे जवळपास २५० ते ३०० रुपये किलो असा भाव मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मिळतो आहे.
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे याचा परिणाम थेट उत्पादनावर होऊन यंदा ७० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटणार असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चीनची द्राक्ष विक्रीला उपलब्ध झाली आहेत. यावर बोलताना बाजार समितीचे संचालक संजय पानसरे म्हणाले की, भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे, तेव्हापासून जागतिक व्यापारामध्ये भारत आणि जग एक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बहुतांश बाजार समित्यांमध्ये आयात केलेला माल येत आहे. यामध्ये चायना माल अधिक असल्याचं ते म्हणाले.
