नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबारात मिरची हंगाम संपुष्टात आला आहे. यंदा २ लाख क्विंटलवर मिरची हंगामाची सांगता झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच हजार क्विंटल जादा मिरची आवक असतानाही पावडर उद्योगाला वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे मात्र तूटीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना मिरची कमी-अधिक दर संपूर्ण हंगामात मिळत असले तरीही उत्पादन खर्च वाढीमुळे पावडरच्या दरात ३५ टक्के वाढ झाली आहे.
नंदुरबार येथील मिरची देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी खरेदी करतात. ऑक्टोबरपासून सुरू झालेला मिरची हंगाम यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून संपुष्टात येण्यास सुरुवात झाली होती. तूर्तास नंदुरबार बाजारात मिरचीचे एकही वाहन येत नसल्याने बाजारात शुकशुकाट आहे. नंदुरबार, तळोदा, शहादा या तीन तालुक्यांत सात हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात लाली, व्हीएनआर व तेजा या वाणांची लागवड झाल्याने शेतकरी आणि व्यापारी असे दोघेही खूश होते.
परंतु, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी आणि खराब हवामान यामुळे मिरची पिकाला फटका बसून शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले. यानंतरच्या काळात झाडावर पुन्हा मिरची येऊ लागल्याने १ लाख क्विंटलवर आटोपण्याची शक्यता असलेला मिरची हंगाम थेट २ लाख क्विंटलपर्यंत टिकून राहिला होता.
उलाढाल गेल्या दोन वर्षांपेक्षा ३० टक्के कमी
२०२३-२०२४ या हंगामात नंदुरबार बाजारात विक्रमी ३ लाख ३५ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. यामुळे बाजारातील उलाढाल ही १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. या काळात मिरचीला कमीत कमी ३ हजार ते जास्तीत जास्त ६ हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. ही घोडदौड कायम राहिल या अपेक्षेने शेतकन्यांनी २०२४ मध्ये मिरची लागवडीत वाढ केली. परंतू पुन्हा पावसाने दगा दिल्याने मिरची उत्पादन घटले होते.
मिरची पावडर तयार करणारे ४० उद्योग संकटात
नंदुरबारमधील लाली, व्हीएनआर आणि तेजा या मिरची वाणांपासून तयार केलेली पावडर देशभरात पाठविली जाते. नंदुरबार शहरातील ४० कारखाने यासाठी जानेवारी महिन्यापासून अहोरात्र धडधडत आहेत. परंतू यंदा मिरची पावडर तयार करण्याचा खर्च दुपटीने वाढल्याने आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने काही कारखाने बंद पडले आहेत. ज्यांच्याकडे सध्या पावडर शिल्लक आहे. त्यांच्याकडून वाढीव दराने त्याची विक्री सुरु झाली आहे.
नंदुरबार शहरातून प्रत्येक हंगामात १० हजार टन मिरची पावडर तयार विक्री केली जाते. यासाठी सरासरी अडीच लाख क्विंटल मिरची आवश्यक आहे. परंतू यंदा केवळ केवळ दोन लाख टन मिरचीची खरेदी झाली आहे. यापासून साधारण ७ हजार टन पावडरची निर्मिती झाली आहे. उर्वरित ३ हजार टन तयार करण्यासाठी कारखानदार गुंटूरच्या मिरचीकडे लक्ष लावून बसले आहेत.
परंतू तेथेही मालाची कमतरता असल्याने यंदा कारखानादारांचे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या ६ काळात ओल्या लाल मिरचीला १ हजार ६०० ते ५ हजार ५११ रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात होता. सुक्या लाल मिरचीला सर्वाधिक ६ हजार ६०० ते ११ हजार २०० प्रतिक्विंटल दर होता. हे दर वाढीव असल्याने कारखानदारांनी खरेदी करताना जादा पैसे मोजत आहेत.
परिणामी २०२४-२०२५ या हंगामात १ लाख २५ हजार हेक्टर मिरची उत्पादन झाले. परंतू गतवर्षी दर चांगले असल्याने मिरचीच्या उत्पादनाला पसंती देत शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड केली. यातून २०२५-२०२६ या मिरची हंगामात २ लाख क्विंटल मिरची आवक झाली होती. सुरुवातीच्या काळात कमी अधिक दर मिळत गेल्याने मिरचीची उलाढाल मंदावली होती.
परंतू जानेवारी ते मार्च या काळात आवक वाढत गेल्याने २ लाख क्विंटल मिरची खरेदी विक्रीतून तब्बल ६५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमीच असल्याने मिरची बाजारावर यंदाही मंदीचे सावट असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
