Chana Tur Market Update : रब्बी हंगाम सुरू होत असतानाच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभरा व तूर या प्रमुख कडधान्यांच्या दरांमध्ये विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे.(Chana Tur Market Update)
हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी निराश आहेत, तर तुरीच्या दरात अचानक वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Chana Tur Market Update)
२०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने हरभऱ्याचा किमान आधारभूत दर (MSP) २१० रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये निश्चित केला आहे. (Chana Tur Market Update)
मात्र, वाशिम जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या हरभऱ्याची सरासरी खरेदी ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने होत आहे. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात अपेक्षित भाव न मिळाल्याने हरभरा उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
दुसरीकडे, तुरीच्या दरात मात्र तेजी दिसून येत आहे. यंदा तुरीसाठी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.
वर्षभर तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांदरम्यान स्थिर होते. मात्र सध्या बाजारात तुरीचे दर ७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले असून काही ठिकाणी नवीन तुरीला ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक भागात तुरीचे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर ढगाळ वातावरणामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीने उत्पादनावर परिणाम केला.
त्यामुळे एकूण उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असे असले तरी काही भागात नवीन तुरीचे उत्पादन समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगतात.
सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली असली तरी गावरान तुरीचा हंगाम जानेवारी अखेरनंतरच जोरात सुरू होणार आहे. आगामी काळात आवक वाढल्यानंतर दर टिकून राहतात की आणखी वाढतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Betel Leaf Market : पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; बाजारात भाव तेजीत
