Join us

भाजीपाल्याची आवक घटली, बाजार वाढले, पालेभाज्यांना काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 20:41 IST

Bhajipala Market : नाशिक मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक मागील दहा दिवसांपासून ४० टक्के इतकी घटली आहे.

नाशिक : पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक (Vegetable Market) घटली असून, त्याचा फार मोठा परिणाम किरकोळ बाजारावर होत आहे. रविवारी आषाढी एकादशीला मागणी कमी असताना जवळपास ५० टक्के भाज्यांचे दर १०० रुपये पार झाले आहेत. भेंडी मात्र या आठवड्यात २० रुपयांनी स्वस्त झाली.

नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik Bhajipala Market) इतर बाजार समित्यांमध्ये चौकशी केली असता पालेभाज्यांची आवक मागील दहा दिवसांपासून ४० टक्के इतकी घटली आहे. पावसामुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील पालेभाज्यांची माती झाली. त्यामुळे पालेभाज्यांची आवक तब्बल ८० टक्के कमी झाली आहे. शेवगा अन् गवार रविवारी २०० रुपये किलो झाली. तर आषाढी एकादशीला रताळे ६० रुपये किलो विकले गेले. मागील वर्षी एकादशीला हेच भाव होते.

कोथिंबीर, मेथी कडाडली; ६० रुपये भावपालेभाज्यांची आवक या आठवड्यात घटली. रविवारच्या बाजारात कोथिंबीर, मेथी ६० तर पालक ४० रुपये जुडी होती. मागील दहा दिवसांच्या तुलनेने या तिघा भाज्यांमध्ये दहा रुपयांची वाढ झाली. याही भाज्यांची आवक कमी आहे. तसेच साल काढलेल्या लसणाच्या पाकळ्यांनाही मागणी आहे. 

भाज्यांचे दर कसे आहेत? निवडक भाज्यांचे दर पाहिले असता शेवगा 200 रुपये किलो, गवार 200 रुपये किलो, वांगी शंभर रुपये किलो, भेंडी 80 रुपये किलो, काकडी 60 रुपये किलो, पालक 40 रुपयाला जुडी, कारले 120 रुपये किलो, हिरवी मिरची 120 रुपये किलो असे दर आहेत. 

टॅग्स :भाज्यामार्केट यार्डनाशिकटोमॅटोशेती क्षेत्र