Baradana : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, गेल्या काही दिवसांपासून बारदान्याअभावी ठप्प असलेली सोयाबीन खरेदी अखेर पुन्हा सुरू झाली आहे. (Baradana)
हमीभाव खरेदी केंद्रांवर आवश्यक तेवढा बारदाना उपलब्ध झाल्याने बहुतांश केंद्रांवर तातडीने खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. (Baradana)
यामुळे खरेदीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा मोठा ताण कमी झाला असून, 'आता तरी सोयाबीन विक्री होईल' अशी आशा निर्माण झाली आहे.(Baradana)
गेल्या पंधरा दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील अनेक हमीभाव केंद्रांवर बारदान्याअभावी सोयाबीन खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
अनेक शेतकऱ्यांनी केंद्र चालकांमार्फत थेट फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर फेडरेशनने तातडीने पावले उचलत कोलकाता येथून मोठ्या प्रमाणावर बारदाना खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
७० गाठी बारदाना दाखल, उर्वरित पुरवठा मार्गावर
फेडरेशनने कोलकाता येथून सुमारे २५ लाखांहून अधिक बारदान्याची ऑर्डर दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात ७० गाठी म्हणजे सुमारे ३५ हजार बारदाना दोन दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील काही हमीभाव केंद्रांवर उपलब्ध झाला आहे.
उर्वरित बारदाना ट्रकद्वारे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात पोहोचत असून, पुढील काळात बारदान्याची कमतरता भासणार नाही, असा दावा फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
खरेदी केंद्रांवर चैतन्य
अचानक उपलब्ध झालेल्या बारदान्यामुळे खरेदी केंद्रांवर पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र चालकांकडून मोजणी, भराई व नोंदणीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.
अनेक शेतकरी, जे टोकन घेऊन अनेक दिवस प्रतीक्षेत होते, त्यांनी पुन्हा सोयाबीन खरेदीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. 'काही दिवसांपूर्वी बारदाना नसल्यामुळे खरेदी पूर्णपणे बंद होती, मात्र आता खरेदी सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,' अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
१५ दिवसांनी मिळाला दिलासा
जिल्ह्यात १ डिसेंबरपासून बहुतांश केंद्रांवर सोयाबीन खरेदी थांबली होती. सातत्याने तक्रारी व दबाव वाढल्यानंतर अखेर १४ व १५ डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यासाठी ३५ हजार बारदाना उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे धाराशिवसह इतर काही केंद्रांवरील खरेदीला वेग आला आहे.
गोदामातील अडचणी कायम
दरम्यान, खरेदी केलेले सोयाबीन गोदामात पाठवताना अडचणी येत असल्याचेही चित्र आहे. गोदामात गेलेले ट्रक दोन ते तीन दिवसांतही खाली होत नसल्याने खरेदी केंद्रांवर साठा अडकून पडत आहे.
गोदामांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने माल उतरवण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फेडरेशनने गोदामांमध्ये पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केंद्र चालकांकडून होत आहे.
एकूणच बारदान्याचा प्रश्न मार्गी लागल्याने सोयाबीन खरेदीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी गोदाम व्यवस्थापनातील अडचणी दूर केल्यास खरेदी प्रक्रिया अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
