Banana Market : सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, उत्पादन घटले आणि दर कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मेहनत वाया गेली आहे, आणि केळी उत्पादकांचे आर्थिक संकट वाढले आहे.(Banana Market)
अर्धापूर व बोरखेड परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. उत्तर भारतातील पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व पुरपरिस्थितीमुळे वाहतूक दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून स्थानिक बाजारात केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.(Banana Market)
दर कोसळले
काही महिन्यांपूर्वी केळीला २ हजार ते २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता.
सध्या हा दर अवघ्या ४०० ते ५०० रुपयांवर आला आहे.
दुय्यम दर्जाच्या केळीस व्यापारी फक्त ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत.
ऑगस्ट महिन्यातील १ हजार ८०० रुपयांच्या दराच्या तुलनेत गेल्या महिनाभरात केळीचे दर तब्बल १ हजार २०० रुपयांनी घसरले आहेत.
हवामानाचा दणका
सततचा पाऊस, वादळी वारे यामुळे केळीच्या बागांना थेट फटका बसला आहे. वजनदार झालेली झाडे कोसळल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडांवर अजूनही घड पिकत असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी भार आला आहे.
केळीचे गणित
एक एकरात साधारण १ हजार ७०० झाडे बसवली जातात.
पिकावर ८० हजार रुपये खर्च येतो.
उत्पादन घेण्यासाठी १५ महिने लागतात.
एकरी सरासरी ३०० क्विंटल उत्पादन मिळते.
परंतु, सध्याच्या भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही.
शेतकरी संकटात
अर्धापूर आणि बोरखेड येथील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत
दरातील घसरण
हवामानामुळे नुकसान
दर सुधारले नाहीत, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
दीड एकरात केळी लागवड केली होती. पहिली कटाईसुद्धा सुरू झालेली नाही; पण दर घसरल्याने दोन दिवसांपूर्वीच लहान-मोठी केळी व्यापाऱ्यांना अवघ्या ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने द्यावी लागली. त्यामुळे खर्च निघण्याची सुद्धा आशा नाही. - ज्ञानदेव बारब्दे, शेतकरी