Banana Market : मागील महिनाभर केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट आता काही प्रमाणात दूर झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात केळीला मिळणारे कवडीमोल दर शेतकऱ्यांच्या चिंता वाढवत होते. (Banana Market)
परंतु बाजारातील पुरवठा कमी होताच मागणी अचानक वाढली आणि केळीच्या दरात लक्षणीय तेजी दिसून आली आहे. सध्या केळीला प्रतिक्विंटल ८०० रुपये मिळू लागले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Banana Market)
नोव्हेंबरमध्ये दर घसरले, शेतकरी चिंतेत
वसमत तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र नोव्हेंबरमध्ये केळीला मिळणारा दर फक्त ३ ते ४ रुपये प्रतिकिलो (प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये) इतका घसरला होता. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. अनेकांनी तर तोट्यामुळे केळीच्या बागांची छाटणी कमी केली किंवा नवी लागवड न करण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कायम
* वसमत तालुक्यातील केळीला देशविदेशात मोठी मागणी आहे.
* इराण, इराक या देशांत केळीची चांगली निर्यात
*दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांतही मोठा पुरवठा
जुलै-ऑगस्टमध्ये निर्यातक्षम केळीला २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. तर देशांतर्गत बाजारपेठेत १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली होती.
पुरवठा कमी, मागणी वाढली; दर पुन्हा चढले
गेल्या दीड महिन्यापासून केळीचा दर स्थिर नव्हता. पुरवठा जास्त आणि मागणी कमी असल्याने भाव कोसळले होते. मात्र आता बाजारात केळीचे प्रमाण कमी होताच दर पुन्हा सुधारले आहेत.
सध्या दर वाढून ८०० रुपये प्रतिक्विंटल झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांना आशा आहे की ही दरवाढ पुढील काही दिवस स्थिर राहील.
ही तेजी टिकून राहो- शेतकऱ्यांची अपेक्षा
केळी उत्पादकांचे म्हणणे आहे की, दरवाढीमुळे थोडा तरी दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात जे नुकसान झाले त्याची भरपाई पूर्णपणे होत नाही; पण सध्याची वाढ पुढील काळात टिकून राहिली तर परिस्थिती सुधारेल.
