Banana Market : केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शिल्लक पीक मिळवण्यासाठी शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल घट झाल्यामुळे 'चारशे-पाचशे रुपये द्या, पण केळी घ्या' असा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आग्रह धरला आहे. (Banana Market)
अर्धापूर तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. ३५ ते ४० टक्के काढणी शिल्लक आहे. मागील आठवड्यापासून केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शिल्लक राहिलेल्या केळीला भाव मिळतच नसल्याने उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांना चारशे, पाचशे रुपये द्या; पण केळी घ्या म्हणायची वेळ आली आहे. (Banana Market)
मागील दोन महिन्यांच्या दरात आणि आजच्या दरामध्ये १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल रुपयांची घट झाली आहे. यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Banana Market)
केळीला मिळतोय काय भाव
मागील आठवड्यापासून केळीच्या दरात १ हजार ५०० रुपयांची घसरण झाली असून, चांगल्या दर्जाच्या केळीला ९०० रुपये प्रतिक्विंटल तर मध्यम दर्जाच्या केळीला ७०० रुपये प्रतिक्विंटल आणि कमी दर्जाच्या केळीला ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
केळी बाजारपेठेत आंध्र प्रदेश बुरानपूर अन्य राज्यांतील केळीची आवक वाढल्याने खरेदी दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तसेच उत्तर भारत अतिवृष्टीमुळे मागणी घटल्याने दरात मोठी घसरण झाली.
अतिवृष्टीमुळे उत्तर भारतातून मागणी कमी
अर्धापूर येथून मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात केळीची निर्यात केली जाते; परंतु उत्तर भारतात अतिवृष्टीमुळे मागणी कमी झाल्याने येथील व्यापाऱ्यांकडून मागणी होत नाही. मागणी कमी झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
दर घसरणीची कारणे
* आंध्र प्रदेश आणि बुऱ्हानपूर येथून कमी दरात आणि कमी गाडी भाड्यात केळी उपलब्ध आहे.
* उत्तर भारतात अतिवृष्टीमुळे मागणी कमी झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी कमी झाली आहे.
* यामुळे अर्धापूर बाजारात केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
आंध्र प्रदेश बुरानपूर येथून कमी दरात आणि कमी गाडी भाड्यात केळी मिळत आहे. त्यामुळे अनेक व्यापारी व कंपन्या आंध्र प्रदेश व बुरानपूर येथून केळी खरेदी करीत आहेत. - समीर नदाफ, केळी व्यापारी