Banana Market : श्रावण, गणपती, नवरात्रासारख्या सणांमध्ये केळीला हमखास दरवाढ मिळते, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, यावर्षी केळीच्या दरात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाली असून, खर्च अधिक आणि मिळकत कमी अशा स्थितीत आहे. (Banana Market)
अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात निर्यातीचा थोडासा दिलासा असला, तरी बहुतांश शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Banana Market)
सण तोंडावर असतानाही बाजारात केळीच्या दरात समाधानकारक वाढ झालेली नाही. उलट, मागील पंधरवड्यात १ हजार ५०० रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी सध्या केवळ १ हजार १०० ते १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. त्यामुळे महागड्या लागवडीखाली गेलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Banana Market)
लाखो रुपयांचा खर्च, तरीही मिळत नाही परतावा
केळी ही सुमारे १५ महिन्यांची फळबाग पिक असून, त्याच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंत एकरी सरासरी दीड लाख रुपये खर्च येतो. सिंचन सुविधा आणि बाजारपेठेची उपलब्धता पाहून अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी केळीची लागवड करत आहेत. मात्र, यंदा बाजारातील मागणीप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दरात घट
श्रावण महिना सुरू झाला की, साधारणतः बाजारात फळांची मागणी वाढते. विशेषतः केळीला धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून जास्त मागणी असते. यामुळे मागील वर्षी याच काळात केळीचे दर १ हजार ८०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले होते. मात्र यंदा १ हजार ५०० रुपये मिळत असलेले दर अचानक १ हजार १०० रुपयांवर घसरले, त्यामुळे उत्पादन खर्च भरूनही निघणे कठीण बनले आहे.
निर्यातीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
दर घसरणीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र थोडा दिलासा मिळतो आहे. कारण या भागात नियमित निर्यात होणारी दर्जेदार केळी मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. येथून इराण, इराकसह आखाती देशांमध्ये केळी निर्यात होत असल्याने स्थानिक बाजारभावावर शेतकऱ्यांचा फारसा परिणाम झाला नाही. सध्या १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर या भागात मिळत आहे.
दरासाठी हमी यंत्रणा हवी
या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडे फळपिकांनाही हमीभाव यंत्रणेचा लाभ मिळावा, अशी मागणी केली आहे. महाग लागवड, वाढते उत्पादन खर्च आणि अकल्पित बाजारघट यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची स्थिती अत्यंत अडचणीची झाली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर वाचा सविस्तर