Banana Market : शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार मानल्या जाणाऱ्या केळी पिकाचे अर्थकारण मोठ्या संकटात आले आहे. तेल्हारा तालुक्यातील शेकडो शेतकरीकेळी लागवडीकडे वळले असले तरी सध्या मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. . (Banana Market)
बाजारात केळीला फक्त ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागांवर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. (Banana Market)
......पण भाव घसरून तळाला
तालुक्यात गेल्या काही वर्षांत सिंचनाच्या सुविधा वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी लागवडीकडे वळण घेतले. एकूण ६०० हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने शेतकरी उत्साहात होते; पण यावर्षी परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे.
केळीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी सव्वा ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च येतो. परंतु बाजारात मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या निम्माही नाही, उलट व्यापारीही अशा केळी घेण्यास तयार नसल्याने शेतकरी नैराश्यात आहेत.
घसरलेल्या भावामुळेबागांवर नांगर
हिवरखेड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या आशेने केळीची लागवड केली होती. मात्र, आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तोडणीचा खर्चही भरून न येण्याइतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे.
केळीला मिळणारा ३५० ते ४०० रुपये दर परवडणारा नाही. कष्टाने उभ्या केलेल्या बागांवर नांगर फिरवावा लागतोय, यापेक्षा मोठे दु:ख नाही असे स्थानिक केळी उत्पादक सांगतात.
करपा व रोगराईने गुणवत्तेवर परिणाम
यावर्षी सततच्या पावसाने केळीची झाडे पूर्णपणे सुदृढ राहिली नाहीत. यामुळे अनेक बागांमध्ये ओला करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
घडांवर काळे डाग
पल्पचे प्रमाण वाढलेले
केळी लवकर पिकणे
निर्यातीस अयोग्य गुणवत्ता
ही सर्व लक्षणे दिसत असून त्यामुळे केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. निर्यात कमी झाल्याने स्थानिक बाजारात केळीची उपलब्धता वाढली आणि त्याचा थेट परिणाम भाव पडण्यावर झाला.
ग्राहकांसाठी मात्र दर स्थिर – ४० ते ६० रुपये डझन
शेतकऱ्यांना मिळत असलेल्या अत्यल्प दरांच्या उलट ग्राहकांना मात्र केळी ४० ते ६० रुपये डझनने खरेदी करावी लागत आहेत.
मध्यस्थांमधील वाढलेल्या शृंखलेमुळे शेतकरी ते ग्राहक दरात प्रचंड तफावत आहे.
हमीभावाची मागणी जोर धरतेय
शेतकरी संघटनांनी केळीला अन्य शेतीपिकांप्रमाणे हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकारने केळी उत्पादकांच्या स्थितीकडे तातडीने लक्ष द्यावे, नाहीतर पुढील हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी केळी लागवड कमी करतील, असा इशाराही देण्यात येत आहे.
