APMC Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्यांनी अक्षरशः अतिक्रमणाचे रूप घेतले असून, संपूर्ण मोंढा गोदामासारखा दिसू लागला आहे.
शेतकऱ्यांसाठी मोकळी जागा शिल्लकच राहिली नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांची ही मनमानी रोखण्यास बाजार समिती प्रशासन असमर्थ ठरत असल्याची टीका शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.
टिनशेड वाढवले… तरीही जागेची समस्या कायम
मोंढ्यात दोन टिनशेड असून, शेतकऱ्यांच्या वाढत्या आवकेमुळे काही महिन्यांपूर्वी आणखी एक शेड उभारण्यात आले. मात्र, नव्याने वाढवलेला शेड वापरातच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. उलट, लिलावासाठी असलेल्या दोन्ही शेडमधील अर्ध्याहून अधिक जागा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्यांनी व्यापली आहेत.
नियमांनुसार शेतमालाच्या थप्प्या २४ तासांत मोंढ्यातून हलवणे अनिवार्य आहे. परंतु येथे त्या आठवडा ते पंधरा दिवसांपर्यंत जागच्या जागी पडून आहेत. यामुळे व्यापारी नियम धाब्यावर बसवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शेतकऱ्यांचा माल ठेवायला जागाच नाही
व्यापाऱ्यांकडील जुन्या थप्प्यांमुळे मोंढ्यात शेतकऱ्यांच्या आवकेसाठी पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचा माल भिंतीलगत, खड्डे पडलेल्या जागी, अथवा सुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य ठिकाणी टाकावा लागत आहे. यामुळे शेतमालाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाची दुर्लक्षपूर्ण भूमिका
या प्रकाराची माहिती असतानाही बाजार समितीकडून कोणतीही कारवाई होत नाही. न उठणाऱ्या थप्प्या, व्यापाऱ्यांची मनमानी आणि बाजारातील विस्कळीत व्यवस्था याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी शेतकऱ्यांतून समोर येत आहे.
शेतकऱ्यांचा ओढा वाशिमकडे
मागील महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी वाशिम बाजाराची वाट धरल्याचे दिसून येत आहे. हिंगोलीत योग्य जागा, सोयी-सुविधा आणि पारदर्शक व्यवस्था नसल्याने सोयाबीनची अपेक्षित आवक होत नाही. त्यामुळे बाजाराला आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे.
कठोर कारवाई करा
शेतकरी संघटनांनी खालील मागण्या जोरदारपणे मांडल्या आहेत.
मोंढ्यातील व्यापाऱ्यांच्या जुन्या थप्प्या तात्काळ उठवाव्यात
२४ तासांच्या नियमाची कडक अंमलबजावणी करावी
नव्या शेडचा त्वरित वापर सुरू करावा
शेतकऱ्यांच्या मालासाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि समतल जागा उपलब्ध करून द्यावी
सध्या ज्या पद्धतीने मोंढा व्यापाऱ्यांचे गोदाम बनला आहे, त्यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांचा वावर आणि बाजारातील विश्वास हरवण्याचा धोका वाढत आहे.
