खामगाव :बाजारातसोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. (APMC Market)
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लवकरच हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून, येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने निश्चित केलेल्या ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीनुसार (MSP) सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. (APMC Market)
सद्यस्थितीत बाजारात सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत बाजार समितीमार्फत हमीभावाने खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे खरेदी केंद्र खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच सुरू केले जाणार आहे. (APMC Market)
शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू
हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू असून आतापर्यंत २९५ शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. नोंदणीसाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
ऑफलाइन नोंदणीचीही सुविधा
काही शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करताना अडचणी येत असल्याने, अशा शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे कोणताही शेतकरी हमीभाव खरेदीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांना सातबारा उतारा व आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी पूर्ण केली जाते.
खरेदी झाल्यानंतर सोयाबीनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने बँक पासबुक सादर करण्याची आवश्यकता नाही.
बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकरी चिंतेत
यंदा सोयाबीनच्या बाजारभावात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर दिला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. अशा परिस्थितीत शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.
कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. केंद्र उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच खरेदी प्रत्यक्ष सुरू केली जाणार आहे.
कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यामार्फत खामगाव बाजार समितीत शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहे. केंद्र उभारणीचे काम सुरू असून, येत्या आठ दिवसांत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू केली जाईल. शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा.- व्ही. एम. आमले, प्रभारी सचिव, बाजार समिती, खामगाव
