Gahu Jwari Market : ज्वारीचे दर (Jwari Market) कमी असले तरी गव्हाचा वापर अधिक आहे. आरोग्यासाठी चपातीपेक्षा भाकरीच अधिक चांगली असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. भाजी भाकरी हे आपल्या रोजच्या जेवणातील प्रमुख पदार्थ असतात. पण, अलीकडे चपातीमुळे भाकरी खाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. चपातीचा (Gahu Chapati) अतिरेक वाढल्याने त्याचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा भाकरीकडे वळा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्र देताना दिसत आहे.
ज्वारीची मागणी कमी झाल्याने लागवडही कमी झाली होती. गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) ज्वारीचे पीक फार कमी प्रमाणात घेतले जाते. रब्बी ज्वारीची (Rabbi Jwari) काढणी सुरू होणार असून, त्यानंतर बाजारात दर आणखी कमी होणार आहेत. किरकोळ बाजारात ३५ ते ५० रुपयांपर्यंत दर आहेत. ज्वारीमध्ये आरोग्यास प्रोत्साहन देणारी अनेक पोषक तत्वे आहेत. तसेच अँटिऑक्सिडंट फिनोलिक संयुगे इतर धान्यांच्या तुलनेत जास्त असतात. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुधारते आणि आजारांचा धोका कमी करण्यासदेखील मदत करते.
गव्हापेक्षा ज्वारीचे दर अधिक
सध्या बाजारात गव्हाचे प्रतिकिलो ३५ ते ५० रुपयांपर्यंत दर आहे. रब्बी काढणीनंतर वात आणखी घसरण होण्याचा अंदाज आहे. सध्या घाऊक बाजारात ज्वारीचे प्रतिक्विंटल दर ४ हजार ५०० ते ५५०० रुपये इतका दर आहे. किरकोळ बाजारात मात्र, हाच दर ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत राहिला आहे.
रेशनवरील गव्हाने भाकरी गायब
रेशनवर मोफत गहू मिळत असल्याने प्रत्येकाच्या घरी एक वेळच्या जेवणात चपाती असतेच. त्यामुळेही ज्वारीची मागणी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शहर ते ग्रामीण भागापर्यंत चपाती खाण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्वारी हे कोरडवाहू पीक आहे. अल्प काळात ते काढणीस येते. डोंगरमाथा, माळरानावर हे पीक चांगले येते. इतर पिकांच्या तुलनेत कमी मशागतीत व फारशा फवारणी न करता उत्पादन मिळते.
भाकरी खाण्याचे फायदे
- रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदय निरोगी राहतं.
- भाकरीतील फायबर स्नायू मजबूत करते आणि पचनक्रिया सुधारते.
- भाकरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- ज्वारीमुळे कोलेस्टेरॉलही कमी होतो.