नाशिक : मध्य रेल्वेच्या मनमाड येथील मालगोदाम विभागाला (Manmad Railway) मोठा इतिहास आहे. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात कृषी उत्पादने पाठविली जातात. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या विभागाने जवळपास १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. मनमाड मालगोदाम विभागाचे दोन भाग असून मनमाड व अंकाई अशा दोन ठिकाणाहून मालवाहतूक करण्यात येते.
मनमाड येथून संपूर्ण वर्षात १०११ वॅगनमधून सुमारे ६४,३९५ टन इतका कांदा (Onion Export) पाठविण्यात आला आहे. साधारणपणे एका वॅगनमध्ये ६४ टन कांदा साठवण क्षणता आहे. पाटणा येथे सर्वाधिक कांदा पाठविला गेला. येथून ३९९ वॅगन (२५,४४५ टन) मका पाठविण्यात आला.
उत्तर तसेच ईशान्य भारतात तो पाठविण्यात आला असून मका पाठविण्यामध्ये मनमाड माल गोदाम विभागात प्रथम क्रमांकावर आहे. याआधी ४२ वॅगन मका पाठविण्यात आला होता. या आर्थिक वर्षात जवळपास दहापट मका जास्त पाठविण्यात आला.
अंकाई माल गोदाम विभागातून ३९० वॅगनमधून १९ हजार टन कांदा उत्तर व ईशान्य भारतात पाठविण्यात आला. तसेच येथून ८४ वॅगनमधून ५३७३ टन मका पाठविण्यात आला. मनमाड विभागाला कांदा वाहतुकीच्या माध्यमातून ८ कोटी ४० लाख ३९ हजार ९८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
मका वाहतुकीतून मिळाले ६ कोटींचे उत्पन्नमका वाहतुकीच्या माध्यमातून ६ कोटी ३१ लाख ८५ हजार ६३४ रुपये उत्पन्न मिळाले. अंकाई गोदामाद्वारे २ कोटी ७४ लाख ५४ हजार १२६ रुपये उत्पन्न प्राप्त झाले. मनमाडला नाशिक जिल्ह्यासाठी खते येत असतात. जिल्हाभरात मनमाड येथून खतांचा पुरवठा केला जातो. या आर्थिक वर्षात ३४७५ वॅगनमधून २ लाख २४ हजार ८२७ टन खते दाखल झाली. गतवर्षी पेक्षा ४०० वॅगन अधिक खते गोदाम विभागात आली आहेत.
१३० कामगारांना मिळाला रोजगारमनमाड गोदावरी रॅक पॉईंटवर सुमारे १३० माथाडी कामगारांना रोजगार उपलब्ध झाला असून कांदा व मक्यासाठी दोन काटिंग एजंट तर खतांसाठी एक काटिंग एजंट कार्यरत आहे. अंकाई रेक पॉइंट येथे शंभर माथाडींना रोजगार उपलब्ध आहे.