Join us

लासलगावहून पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन कांदा पाठवला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:35 IST

Onion For Punjab : लासलगावमधून रवाना झालेला हा कांद्याचा ट्रक तब्बल १६०० किलोमीटरचा प्रवास करत पंजाबला पोहोचणार आहे.

नाशिक : पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे हाल होत असताना, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तब्बल पाच लाख रुपये बाजार मूल्य असलेला ४० टन कांदा पंजाबमधील पूरग्रस्तांना रवाना करण्यात आला आहे. 

लासलगावमधून रवाना झालेला हा कांद्याचा ट्रक तब्बल १६०० किलोमीटरचा प्रवास करत पंजाबला पोहोचणार आहे. व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमधून ट्रकवर कांदा चढविण्यासाठी स्थानिक वाहनचालकांनीही स्वखर्चाने मदत केली.

विशेष म्हणजे, या वाहतुकीचा दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च मनमाड येथील गुरुद्वारा गुप्तसर साहेब आणि पंजाबी शीख बांधवांनी उचलला आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र-पंजाब या दोन राज्यांमधील सामाजिक ऐक्य आणि 'मानवतेचे नाते' दृढ झाले आहे. 

व्यापारी व शीख बांधवांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संकटग्रस्तांना दिलासा मिळणार असून, लासलगाव कांदा व्यापाऱ्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. 

टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र