Join us

बांगलादेशने आयातबंदी हटविल्यानंतर कांदा दरात काय बदल झालेत का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:45 IST

Kanda Market : बांगलादेश सरकारने गेल्या १४ ऑगस्ट रोजी कांद्यावरील आयात बंदी (Onion Import) हटवल्यानंतर काय परिस्थिती आहे..

नाशिक : बांगलादेश सरकारने गेल्या १४ ऑगस्ट रोजी कांद्यावरील आयात बंदी (Onion Import) हटवल्यानंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसून आला. कांद्याला एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Kanda Market) कांद्याच्या जास्तीत जास्त भावात १७५ रुपये तर सरासरी ७५ रुपये वाढ झाली. मात्र यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ कमी असून बांगलादेशमधील व्यापाऱ्यांना अधिक प्रमाणात कांदा आयात करण्यासाठी परवाने मिळालेले नाहीत, त्यामुळे भारतातून निर्यातीवर मर्यादा येत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

सोमवारी लासलगाव येथे ११२६ वाहनांतून एकूण १६ हजार ५९२ क्विंटल कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त १९०० तर कमीत कमी ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या आठवड्यात शनिवारी ५८२ वाहनांतून ८ हजार ६२४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती, त्यावेळी जास्तीत जास्त भाव १७२५ रुपये तर सरासरी १५७५ रुपये होता.

२० आणि २२ ऑगस्टला लिलाव बंदजैन समाजाचे पर्युषण पर्वास २० ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे तर २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा सण असल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. २१ ऑगस्ट व २२ ऑगस्टपर्यंत पोळ्याची सुटी वगळता दररोज कांदा लिलावाचे कामकाज हे सकाळी १० वाजेच्या दरम्यान सुरू होणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आम्ही १२ एकरात उन्हाळी कांद्याचे पीक घेतले आहे. दुष्काळामुळे अतिरिक्त खर्च करून टँकरने पाण्याचा वापर केला, त्यामुळे उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १७०० ते १८०० रुपये आहे. मात्र बाजारभाव खूप कमी आहे. या परिस्थितीत कांद्याला प्रतिक्विंटल किमान १०० रुपयांचे अनुदान दिले जाणे आवश्यक आहे.- नवनाथ शेळके, शेतकरी, सातारे, ता. येवला

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक