नाशिक : तब्बल चार ते पाच वर्षांनी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना (Grape Farmers) समाधानकारक दर मिळत आहेत. उत्तर भारतातून वाढलेली मागणी आणि सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात झालेली घट यामुळे मागणी-पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी, द्राक्षांना किलोला (Grape Market) ५० ते ८० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळत आहे.
गेल्या काही वर्षापासून द्राक्ष उत्पादकांना (Draksh Shetkari) सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच कोरोनाच्या काळात द्राक्षांचे दर अक्षरशः मातीमोल झाले होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत होते. परंतु, यंदा द्राक्षांना मिळालेल्या विक्रमी दरामुळे मागील चार-पाच वर्षांतील नुकसान भरून निघणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहे.
नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या चरणात द्राक्षांना चांगला भाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या काही दिवसात मागणी वाढणार असल्याचेही बोलले जात आहे.
उत्तर भारतातून द्राक्षांना होतेय मोठी मागणी
दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे उत्तर भारतात द्राक्षांना मोठी मागणी आहे. परंतु, सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने द्राक्षांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
उत्पादनावर परिणाम झाल्याने....
द्राक्ष उत्पादक श्रवण वावधाने म्हणाले की, शेतकरी गेल्या दहा वर्षांत द्राक्षांना पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. यावेळी अवकाळी आणि लांबलेली थंडी यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने तेजी आहे. तर द्राक्ष निर्यातदार व्यापारी संदीप डुकरे म्हणाले की, परतीच्या पावसावर मात करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. ५० रुपयांपासून ७५ रुपयांपर्यंत द्राक्षांना प्रतिकिलो भाव मिळत आहे.