Join us

Lasun Bajar Bhav : बारामती बाजार समितीत लसणाला सर्वाधिक भाव प्रतिकिलो कसा मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 10:57 IST

बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रतिकिलोस असा भाव मिळाला.

बारामती : बारामतीबाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रतिकिलोस असा भाव मिळाला तर सरासरी २२० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.

त्याच बरोबर शेवग्याचे भाव ही तेजीत असून शेवग्याला प्रतिकिलो कमाल २५० रूपये व सरासरी २०० रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे तसेच गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत.

थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. बारामती बाजार समितीने जळोची भाजी मार्केट आवारात शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध सुविधांबरोबरच सेलहॉलची उभारणी केलेली आहे.

त्यामुळे शेतामालाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होत आहे तसेच शेतमालाला कटती नाही, कुठलीही सूट नाही. त्यामुळे बारामतीसह आसपासच्या तालुक्यातुन फळे व भाजीपाल्याची आवक होत आहे.

आवारात फळे व भाजीपाला उघड लिलावाने खरेदी विक्रीची सोय असल्याने बाहेरील खरेदीदार येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार आवारातच विक्री करावा, असे आवाहन बारामती बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.

किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४०० रुपये दरमागील वर्षी १०० रुपयांमध्ये चार किलो लसूण घरपोहोच मिळत होता. लसणाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने लागवडीचे प्रमाण घटले. आवक कमी आणि मागणी वाढल्याने यंदा लसणाचे दर वाढले आहेत. बाजारात लसणाचे दर कडाडले आहेत. किरकोळ दरात सध्या बाजारात लसणाला प्रति किलो ४०० दर मिळाला आहे, अशी माहिती श्री गणेश भाजी मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे यांनी दिली.

अधिक वाचा: Sugarcane FRP 2024-25 : गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी एफआरपी प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण वाचा सविस्तर

टॅग्स :बाजारमार्केट यार्डभाज्याबारामतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी