जागतिक बँक अर्थसाहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत नाशिक विभागात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाने, तर राज्यात चौथ्या क्रमांकावर निवड झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप यांनी दिली.
राज्यात जागतिक बँक अर्थसाहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (एसएमएआरटी) प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे. बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मूल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे अपेक्षित होते.
गुणांचे निकष
• पणन संचालनालय, स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषी पणन) यांच्यामार्फत बाजार समित्यांमधील पायाभूत व इतर सेवा सुविधा निकषांसाठी ८० गुण, आर्थिक निकषांसाठी ३५ गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी ५५ गुण व इतर निकषांसाठी ३० गुण असे एकूण २०० गुण निश्चित करण्यात आले होते.
• प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवून दिलेल्या गुणांकनानुसार लासलगाव बाजार समितीच्या सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीची पाहणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांचे कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार लासलगाव बाजार समितीस २०० गुणांपैकी १५७.५ गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत चौथा, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक दिलेला आहे.
बाजार समितीच्या आवारातील सुविधा वाढणार
• लासलगाव बाजार समितीने शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्गाशी समन्वय साधून अमावास्या, शनिवार व इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी लिलावाचे कामकाज सुरू केल्यामुळे वर्षभरात लिलावाचे कामकाज वाढले. तसेच उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीमाल लिलावासाठी मुख्य व उपबाजार आवारांवर लिलाव शेडची उभारणी केली.
• निफाड उपबाजार आवारावर फळे व भाजीपाला, तर मानोरी खुर्द तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात देखील अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून व्यवहार सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे असल्याचे बाजार समिती लासलगावचे सभापती डी. के. जगताप यांनी सांगितले.